रविवारी रेसकोर्सवर अतिशय गजबज असते. परवाचा रविवारही त्याला अपवाद नव्हता. पण या दिवशी गेट क्रमांक ७-८च्या बाजूला असलेल्या गौतम नगर परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे झेंडे घेऊन अनेक कार्यकर्ते उभे होते. येणारे-जाणारे या नव्या गर्दीकडे जरा आश्चर्यानेच बघत होते. अधिक चौकशी केल्यानंतर मनसेचे लोकसभा उमेदवार बाळा नांदगावकर यांची प्रचार फेरी असल्याचे समजले.
प्रचार फेरी सायंकाळी ६.०० वाजता सुरू होणार होती. मात्र मनसेच्या स्थानिक कार्यालयाचे अध्यक्ष नरवणकर आणि त्यांचे उत्साही कार्यकर्ते सायंकाळी सव्वापाच वाजल्यापासूनच ‘साहेबां’ची वाट बघत उभे होते. सायंकाळी ७.०० वाजता लोअर परळ येथे कोल्हापूर वासियांचा मेळावा होता. तेथेही जायचे असल्याने कार्यकर्त्यांना तेथपर्यंत नेण्यासाठी गाडय़ांचा बंदोबस्त करण्याचे काम नरवणकर फोनवरून करत होते. तर कण्र्यावरून कार्यकर्त्यांना तशा सूचनाही दिल्या जात होत्या.
सव्वासहाच्या सुमारास टोयोटा फॉच्र्युनर या गाडीतून नांदगावकर गौतम नगर येथे पोहोचले. नगराच्या टोकाशीच असलेल्या अंबामातेचे दर्शन घेत नांदगावकर यांनी स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकारी यांची चौकशी सुरू केली. पाचच मिनिटांत प्रचार फेरी सुरू झाली. ‘काल साहेबांनी सलग १२ तास पदयात्रा करत शिवडी मतदारसंघ पिंजून काढला आहे. तरी आज सकाळपासून आता संध्याकाळीही साहेब पायीच फिरत आहेत.’ एक कार्यकर्ता दुसऱ्याला सांगत होता. नांदगावकर मात्र या थकव्याची कोणतीही खूण चेहऱ्यावर न दाखवता गौतम नगरमधून फिरण्यास तयार झाले.
गौतम नगर परिसरातील रहिवासी हे महालक्ष्मी रेसकोर्सवरील कर्मचारी आहेत. घरांची बिकट अवस्था, रस्ता असून नसल्यासारखा ओबडधोबड.. या मार्गावरून नांदगावकर अत्यंत उत्साहाने पुढे जात होते. त्यांच्यासह जाणारे कार्यकर्ते ‘लक्षात ठेवा, लक्षात ठेवा.. मनसेचे इंजिन लक्षात ठेवा’ अशा घोषणा देत त्यांचा उत्साह वाढवत होते. घराघरांतील स्त्रिया ताम्हण घेऊन औक्षण करण्यासाठी पुढे येत होत्या. नांदगावकरही औक्षण झाल्यानंतर त्यांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेत पुढे जात होते.
प्रचार फेरी एका पडक्या घरासमोर आली आणि तेथे बसलेल्या एका वयस्कर माणसाने नांदगावकर यांना हाक मारून जवळ बोलावून घेतले. नांदगावकरांचे हात हातात घेऊन तो माणूस बोलू लागला, ‘घराची अवस्था बघा. छप्पर कोसळले आहे. पाण्याची सोय नाही.. आतापर्यंत आमच्याकडे कोणी बघितलेही नाही.. तुमच्याकडून अपेक्षा आहेत.’ नांदगावकरांनी तातडीने विभाग अध्यक्ष नरवणकर यांना त्यांच्या प्रश्नांची दखल घेण्याची सूचना दिली. त्या वयस्कर माणसाच्या पाया पडून आशीर्वाद घेतले आणि प्रचार फेरी पुढे निघाली.
पुढे एका घरात नांदगावकरांना आग्रहाने बोलावण्यात आले. स्वीय सहाय्यकाने ‘मेळाव्या’ची आठवण करून दिली. मात्र नांदगावकर यांनी त्याकडे दुर्लक्ष करत घरात प्रवेश केला. घरात पुन्हा औक्षण झाले. चहाचा आग्रह झाला. मात्र नांदगावकर यांनी चहाऐवजी पाणी पिणे पसंत केले. हे घर येथील एका महिलेचे. या महिलेने पुढाकार घेतल्याने वीजेची आणि पाण्याची लाइन वस्तीपर्यंत पोहोचली. नांदगावकरांनी त्या महिलेची विचारपूस केली. पाच मिनिटे तेथे बसून मग ते पुन्हा चालू लागले.
एवढय़ा छोटय़ाश्या वस्तीत पदयात्रेसाठीही नांदगावकर यांनी तब्बल दोन तास घेतले. प्रत्येक घरातील कच्च्याबच्च्यांपासून वडीलधाऱ्यांपर्यंत प्रत्येकाशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. दिल्लीत गेलो, तर या विभागासाठी नक्कीच काहीतरी चांगले काम करण्याचे आश्वासन दिले. यापुढे लाला कॉलेजजवळील वसाहतीत प्रचार फेरी होती. वेळ कमी होता. मग नांदगावकर आणि कार्यकर्ते यांचा मोर्चा त्या दिशेने निघाला. तेथेही याच प्रकाराची पुनरावृत्ती! मात्र या वेळी मेळाव्याबाबत स्वत: नांदगावकर जागरूक असल्याने थोडक्यात प्रचारफेरी आटपून नांदगावकर मेळाव्याच्या ठिकाणी निघाले.
या मेळाव्याला आमदार राम कदम आणि बाळा नांदगावकर असे दोघेही होते. नांदगावकर आधीच पोहोचले. येथेही फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत झाले. कोल्हापूरहून आलेल्या लेझीम पथकाने मोठय़ा तालात नांदगावकरांचे स्वागत केले. या ठिकाणी कोल्हापूर वासियांशी मुक्त संवाद साधत दीड तास नांदगावकर यांनी वेळ दिला. सगळीकडून चोख मोर्चेबांधणी झाल्याच्या समाधानात नांदगावकर पुढील बैठकांसाठी निघाले.
‘इंजिन’चा अथक उत्साह
रविवारी रेसकोर्सवर अतिशय गजबज असते. परवाचा रविवारही त्याला अपवाद नव्हता. पण या दिवशी गेट क्रमांक ७-८च्या बाजूला असलेल्या गौतम नगर परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे झेंडे घेऊन अनेक कार्यकर्ते उभे होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 23-04-2014 at 06:28 IST
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election campaign of bala nandgaonkar