सर्वत्र घाण पाणी.. चालताना गटारात पाय जाऊ नये म्हणून खाली लक्ष द्यावे तर घरांचे पुढे आलेले बुटके छत डोक्यावर आदळते. एका माणसाला चालतानाही आडवे होऊन चालावे लागते अशा गल्लीबोळांतून प्रवास सुरू होता. ईशान्य मुंबईचे भाजप उमेदवार किरीट सोमय्या यांची प्रचार फेरी अशा वस्त्यांमधून सुरू होती. झगमगत्या मुंबईतील या मिणमिणत्या वस्त्यांमधील मतदारच मोठय़ा संख्येने मतदानास उतरतो. त्यामुळेच या वस्त्यांमधील प्रचार महत्त्वाचा असतो.
दूधाचा भाव किती? साखरेचा भाव किती? असे प्रश्न मतदारांना विचारत आपली सत्ता आल्यावर कशी स्वस्ताई होईल, स्वीस बँकेतील पसा परत कसा येईल याची माहिती देत थेट मतदारांच्या खिशाशी सबंधित प्रश्नांवर चर्चा करताना फायनान्स कॅपिटल मार्केटमध्ये डॉक्टरेट मिळवलेल्या सोमय्या यांनी थेट मतांचा ताळेबंद मांडण्यासच सुरुवात केली. विद्याविहार पूर्व ते घाटकोपर या परिसरातील रथ आणि पदयात्रेत ठिकठिकाणचे औक्षण, स्वागत, मंदिरांमधील दर्शन घेत सोमय्या यांची पदयात्रा प्रवास करत होती.
विद्याविहार येथील जयप्रकाशनगर, डी कॉलनी, शास्त्रीनगर, बंजारा वस्ती, भीमनगर, आंबेडकर नगर, आंबेडकर नगर असा झोपडपट्टी आणि वस्त्यांमधून प्रवास करत असताना सोमय्या यांनी वाटेत अनेकांशी संवाद साधला. परिसरातील घराघरांमधून भाजपचे झेंडे बाहेर येत होते. प्रचारफेरीत कार्यकत्रे खुश असणे गरजेचे असते. त्यांना नाराज करणे परवडणारे नसते. यामुळे प्रचार फेरीच्या संयोजकांची तारेवरची कसरत होत होती. कुणी पाण्यासाठी ओरडत होते. तर कुणी या रस्त्यावरून आपण कसे चालणार, असे प्रश्न पडत होते. कुणाला थेट रथावर सोमैय्यांच्या शेजारीच उभे राहायचे होते. यातील कुणाला वर येऊ द्यायचे आणि कुणाला अडवायचे याचे गणित जमवताना वरिष्ठ कार्यकर्त्यांची धावपळ होत होती.
विद्याविहार रेल्वे स्थानकानजीकच्या एका रस्त्यावर छोटेखानी सभा झाली. पुढे बंगल्यांच्या एका सोसायटीत रथ शिरला. आलिशान बंगले पार करत असताना सोसायटीच्या सचिवांना रथावर घेण्यात आले. यामुळे सोसायटीवाल्यांना उमेदवाराविषयी आपुलकी निर्माण होईल, असा कार्यकर्त्यांंचा विचार होता. सोसायटीचे सचिवही काही काळ रथावर आरूढ झाले होते. या परिसरातील फेरीच्या शेवटच्या टप्प्यात पुन्हा एक छोटी वस्ती लागली. आजूबाजूला गगनचुंबी इमारती, आलिशान बंगले आणि मध्येच एकालाही धड चालता येणार नाही, अशा चिंचोळ्या गल्ल्यांची ही वस्ती.
इथल्या नागरिकांच्या समस्या वेगळ्याच. या झोपडीवासियांना दिलासा देत मीठागरांच्या १६०० एकर जमिनीत परवडणारी घरे देण्याचे आश्वासन देत पुढील प्रवास सुरू झाला. या छोटय़ा वस्तीतून जाताना महिला कार्यकर्त्यांंची मात्र चांगलीच दमछाक झाली. मात्र कितीही उशीर झाला तरी किरीटभाई ही वस्ती टाळत नाही. ते नेहमीच या वस्तीत येतात असा सूर उमटत होता. कुर्ला टर्मिनस रोड येथून सुरू झालेली प्रचार फेरी घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयासमोर संपली. तेथे कार्यकर्त्यांंचे आभार मानून रथ पुढच्या प्रचार फेरीसाठी विक्राळी येथे निघाला.
विक्रोळीतील पार्कसाइट पोलिस ठाण्याच्या हद्दीत प्रवेश करताच फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत झाले. निवडणुका आल्या आहेत. उमेदवार येणारच हे स्वीकारल्याची भावना येथील प्रत्येकाची होती. विक्रोळीच्या सूर्यनगर परिसरात छोटेखानी सभेनंतर पदयात्रा सुरू झाली. पदयात्रेशिवाय पर्यायही नव्हता. अत्यंत गजबलेल्या परिसरात मोठा रथ नेणे शक्यच नव्हते. घरांच्या, दुकानांच्या बाहेर डोकावून उमेदवारांचे अभिवादन जनता स्वीकारत होते. ही पदयात्रा एलबीएस मार्गालगत बाहेर आली आणि तेथेच संपली.
आजूबाजूच्या टॉवरमुळे गुदमरलेल्या या झोपड्यांमध्ये राहायला कुणाला आवडते? पण नोकरी नसल्यामुळे इलाज नाही अशी भावना येथील रहिवाशांनी व्यक्त केली. भांडूप परिसरात बंद झालेल्या कंपन्यांची जागा मॉलऐवजी तेथे आयटी झोन उभारून लाखभर तरुणांना नोकरी देण्याचे आश्वासन किरीट सोमैय्यांनी दिले आणि कमळाची गाडी नजरेआड झाली.
रेल्वे स्थानकावर प्रचार
मोनिका मोरे प्रकरणी सोमय्या यांनी पुढाकार घेत रेल्वे प्रवाशांची स्वाक्षरी मोहीम हाती घेतली होती. यावेळी मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधायचा असेल तर रेल्वे स्थानकाशिवाय योग्य जागा नाही हे त्यांच्या लक्षात आले. यानुसार सोमैय्यांनी रोज सकाळी ७.३० वाजता रेल्वे स्थानकावर जाण्याचा परिपाठ ठेवला आहे. त्याआधी बागा-मैदानांमध्ये जाऊन ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद घेण्यासही ते चुकत नाहीत.
त्याला हात मिळतील?
राजावाडी रुग्णालय परिसरात प्रचार फेरी संपवून विक्रोळीकडे जात असताना सोमय्या खिडकी उघडी ठेवून सर्वाना टाटा करत होते. इतक्यात दोन्ही हात नसलेली एक व्यक्ती त्यांना दिसली. तिला पाहताच त्यांनी गाडी थांबविण्यास सांगितले. त्या व्यक्तीला जवळ बोलवले व नेमके काय झाले याची चौकशी केली. शॉक लागून दोन्ही हात गेल्याचे कळताच. स्थानिक पदाधिकाऱ्याना निवडणुका संपल्यावर यांना हात बसविण्यासाठी आपल्या कार्यालयात घेऊन या, असे आदेश दिले. मोनिका मोरे प्रकरणानंतर दोन्ही हात नसलेल्या किमान १०० जणांना कृत्रिम हात बसविण्याचा संकल्प सोमय्या यांनी केला आहे.
मुलांना चेंडू मिळाला
प्रचार फेरी सुरू असताना वाटेत मदानात खेळणाऱ्या मुलांकडे रथामध्ये बसलेल्या सोमय्या यांची नजर गेली. तेथील मुलांना आवाज देत त्यांनी नवा कोरा चेंडू देऊ केला. आधी येण्यास कंटाळा करणारी पोरं चेंडू दिसताच रथाच्या दिशेने धावत आली आणि रथावरून टाकलेला चेंडू घेऊन पळत सुटली.

Story img Loader