गोरेगावात नागरी निवारा परिषदेच्या संपूर्ण परिसरात गजबज असते ती उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार महेश वामन मांजरेकर यांच्या आगमनाची. मांजरेकरांची छोटेखानी प्रचारसभाही होणार असते. त्यामुळे कॉलनीतच रस्त्याचा चढ जिथे संपतो तिथेच छोटेखानी व्यासपीठ, काही खुच्र्याची मांडामांड, पाठीमागे पक्षाचा बॅनर आणि त्यावर ‘संवेदनशील कलाकार महेश मांजरेकर यांनाच मते द्या..’ असा संदेश, व्यासपीठाच्या भोवतीने रेंगाळलेली कार्यकर्त्यांची गर्दी अशी सगळी जय्यत तयारी असली तरी मांजरेकर नेमके कुठून येणार, याबाबत कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर मात्र गोंधळच असतो. अरे! पण मोटरसायकलवर झेंडे लावलेले कार्यकर्ते कुठेच दिसत नाहीत. त्यांचा पत्ता लागला पाहिजे. कारण तेच तर साहेबांना वाजतगाजत प्रचारफेरीच्या नेमक्या स्थळापर्यंत आणणार असतात. या सगळ्या गोंधळात प्रचारफेरी भलतीकडूनच सुरू होणार असल्याने अध्र्या कार्यकर्त्यांचा जथ्था मनसेच्या इंजिनासह तिथे वाट बघत उभा असतो. अखेर, मनसेचे झेंडे घेतलेले मोटरसायकलस्वार दिसू लागतात आणि ‘साहेब आले रे..’चा एकच गलका होतो.
या मतदारसंघात चौरंगी लढत आहे. काँग्रेसचे खासदार गुरुदास कामत, शिवसेना नेते गजानन कीर्तीकर, ‘आप’चे मयांक गांधी आणि मनसेचे महेश मांजरेकर. यात एक छुपी पाचवी हिरवी मिरची आहे, ती म्हणजे अभिनेत्री राखी सावंत. एवढे पाच उमेदवार या एका विभागात असल्याने साहजिकच या लढतीकडे सगळ्यांचेच लक्ष आहे. पण, खुद्द मांजरेकरांना आपली लढत गुरुदास कामत किंवा कीर्तीकरांशी आहे असे वाटत नाही. उलट, ‘आप’चे उमेदवार मयंक गांधी हे आपल्यापुढचे आव्हान आहे, असे त्यांना वाटते. पण, आजवर मांजरेकरांनी चित्रपटातूनही राजकारणी रंगवलेला नाही. त्यामुळे अचानक ही खेळी खेळताना आपली लोकांमध्ये असलेली प्रतिमा आणि राज ठाकरे यांचा अजेंडा यातूनच आपल्याला दिशा मिळेल, असा विश्वास मांजरेकर व्यक्त करतात. हाच विश्वास तिथे जमलेल्या कार्यकर्त्यांमध्येही दिसतो. नागरी निवारा परिषदेच्या परिसरात राहणारे अनेक कार्यकर्ते या प्रचारफेरीसाठी वेळेत हजर असतात. मात्र, इथे महिला कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय असल्याचे दिसून आले. गाडीतून उतरलेल्या महेश मांजरेकर यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी मेधा मांजरेकर, मुले आणि अभिनेत्री स्मिता तांबे, ‘फू बाई फू’फे म अभिनेता भाऊ कदम, अभिनेता विद्याधर जोशी असा मोठा ताफा असतो. हा सगळाच ताफो त्यांच्याबरोबर इंजिनात चढतो आणि प्रचारफेरीला सुरुवात होते.
नागरी निवारा परिषदेत सगळ्याच इमारती असल्याने इंजिनातून उतरून प्रत्येकाशी थेट संवाद साधायचा प्रश्नच येत नाही. इमारतीच्या गॅलरीतून, खिडक्यातून डोकावणाऱ्या चेहऱ्यांना हात हलवून प्रतिसाद देत ‘महेश वामन मांजरेकरकृत इंजिन फे री’ला सुरुवात होते. देवगिरी, हिमगिरी, चित्रकूट अशा एकेक इमारती मागे टाकत टाकत इंजिन चिंचोळ्या रस्त्यावरच्या दुकानाच्या गर्दीतून वाट काढत पुढे सरकत असते.
इथे तरी मांजरेकर खाली उतरतील, अशी अपेक्षा असते. पण, ती पूर्ण होत नाही. आत्तापर्यंत दोनदा औक्षणासाठी का होईना, ते खाली उतरतात पण, तिसऱ्यांदा पावलापावलावर उभ्या असलेल्या इमारतीतून औक्षणाची हाक येते तेव्हा मात्र आता औक्षणासाठी त्यांना खाली उतरायला सांगू नका रे.. अशी कार्यकर्त्यांमध्ये हाकाटी सुरू होते.
समोर औक्षणासाठी उभ्या राहिलेल्याही आपल्याच कार्यकर्त्यां असतात. मग त्यांच्या चेहऱ्यावरची नाराजी बघून हळूच एखादा कार्यकर्ता पुटपुटतो.. अहो ते इंजिन बरोबर नाही आहे. त्यामुळे त्यांना सारखे खाली उतर-चढ करायला त्रास होतो हो..मनसेच्या या इंजिनाला कार्यकर्त्यांच्या इच्छाशक्तीचे इंधनच ओढून नेते आहे हे मात्र जाणवल्याशिवाय राहत नाही.
महिला कार्यकर्त्यां मेगाफोन न घेताही जोरदार घोषणाबाजी करत असतात. मराठी ‘हृदयसम्राट’ राज ठाकरे यांनी निवडलेल्या उमेदवाराला तुमची मते द्या, असे आवाहन केले जाते. ‘कोण आला रे कोण आला.. मनसेचा वाघ आला’ अशी सुरुवात होते. ‘महेश मांजरेकर आगे बढो.. हम तुम्हारे साथ है’ पासून ‘ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार.. महेश मांजरेकर सुपरस्टार है’ इथपर्यंत वेगवेगळ्या घोषणा देत आजूबाजूच्यांना जागवण्याचे कार्यकर्त्यांचे प्रयत्न सुरू असतात. गर्दीचे लक्ष मात्र इंजिनावर चढलेल्या ‘स्टार’ महेश मांजरेकर यांच्याकडे असते. अरे! तो भाऊ आहे बघ. म्हणत भाऊ कदमला हात दाखवण्यात कित्येकांना रस असतो. स्मिता तांबेही हसत हसत सगळयांच्या अभिवादनाचा स्वीकार करत असते. एवढेच नाही तर महेश मांजरेकरांच्या वतीने फुलं देण्यातघेण्यातही तिने पुढाकार घेतलेला असतो. पण, ही गर्दी फक्त कलाकारांना पाहण्यासाठी असते यात शंका नाही. या गर्दीचे निर्ढावलेपणही असं की.. वरती उभ्या राहिलेल्या विद्याधर जोशींनाही तुम्ही तेच ते बिल्डर घोसालिया ना.. अशी उघड विचारणा होतेच. पण, त्यांनी होकार देताच, अरे शिवाजी भोसलेला त्रास देणारा खलनायक आहे रे तो.. अशाही भावना उघड व्यक्त असतात.
मावळत्या सूर्याच्या साक्षीने पुढे सरकणाऱ्या प्रचारफे रीला काही फाटक्या कपडय़ांतली मुले हात उंचावून, ओरडून ओरडून मांजरेकरांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा हलकीशी जाग येते. मांजरेकरांचे लक्ष जाते ते त्यांनाही हात हलवून प्रतिसाद देतात. आणि ए माझ्या हिरोने हात दाखवला रे.. अशा टाळ्या पिटणाऱ्या त्या वानरसेनेलाही कार्यकर्ते आपल्या प्रचारफेरीत सहभागी करून घेतात.
अचानक ‘मनसेच्या तळ्यात मक्याची कणसे. आम्ही नाही आणली भाडय़ाची माणसे’ अशीही घोषणा होते खरी. पण, त्याच गर्दीत कुठेतरी अचानक येऊन मिसळणाऱ्या माणसांमध्ये ‘अरे राष्ट्रवादीचंही काम करा रे. सारखेच मनसे मनसे करत असता’ अशी कुजबुज ऐकली की त्या घोषणेचा प्रभावही विरून जातो. पण, या विभागात शिवसेना आणि मनसेची मते कुठेही जाणार नाहीत, असे मत एक आजोबा व्यक्त करतात. कार्यकर्त्यांच्या जोमाने, त्यांच्या घोषणाबाजींमुळे या इंजिनाची फेरी धडधडत आजूबाजूंना जागे करण्याचे काम मात्र नक्की करते!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा