शे-दीडशे कार्यकर्त्यांचा जल्लोष, दणक्यात स्वागत, वेगवान पदयात्रा, मतदारांचा प्रतिसाद अशा चढत्या क्रमाने रंगत गेलेल्या प्रिया दत्त यांच्या वांद्रे येथील पदयात्रेचा शेवट मात्र अगदीच वेगळा झाला. अतिउत्साही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची नियोजनशून्यता यांच्यामुळे हतबल आणि हताश झालेल्या प्रिया दत्त स्कायवॉकखालील बाकावर डोक्याला हात लावून बसल्या तेव्हाही कार्यकर्ते पदयात्रेच्या जल्लोषातच मग्न होते. अखेरीस दोन तासांनंतरही कार्यकर्त्यांना आवर घालणे कठीण असल्याचे पाहून प्रिया दत्त केवळ व्यक्तिगत सुरक्षा रक्षकांसोबत वांद्रे स्थानकाच्या पादचारी पुलावरून चालत्या झाल्या तेव्हा नेमका दोष कोणाचा त्याचा वाद कार्यकर्ते घालत होते.
त्याचे झाले असे.. राज्यातील काँग्रेसची हक्काची जागा समजल्या जाणाऱ्या उत्तर मध्य मतदारसंघात प्रिया दत्त गेल्या काही दिवसात जोरदार प्रचार करत आहेत. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात त्यांनी वांद्रे पूर्वेकडील बेहराम पाडा व खेरनगर भागात पदयात्रा काढली. शेवटचे दिवस असल्याने सकाळपासूनच पदयात्रांचा झपाटा लावला होता. विलेपार्ले येथे सकाळी साडेनऊपासून प्रचारयात्रेत भाग घेऊन दुपारी पावणेबाराच्या सुमारास त्या खेरनगरमध्ये आल्या तेव्हा शे दीडशे कार्यकर्ते त्यांच्या स्वागताला उभे होते.
खेरनगर, अहमद झकेरीया नगर, इंदिरा नगर, बेहराम पाडा, अमृत नगर, दौलत नगर असे करत खेरवाडी सिग्नलला पदयात्रा पूर्ण करण्याचे ठरले होते. त्यामुळे खेरनगरजवळ प्रिया दत्त यांना सोडून त्यांची गाडी खेरवाडी सिग्नलला नेण्यात आली. प्रिया दत्त यांनी नेहमीच्या वेगवान चालीत खेरनगरच्या गल्ल्यांमध्ये फिरत बेहराम पाडा गाठला तेव्हा त्यांचा वेग पकडणे काँग्रेस प्रचारगाडीलाही शक्य होत नव्हते. बहुतेक सोसायटीच्या दारांत प्रिया दत्त यांचे औक्षण करून स्वागत होत होते, गॅलरीत उभे राहून लोक हात उंचावून प्रतिसाद देत होते. खेरनगर झाल्यावर वांद्रा स्टेशन पूर्वेला खेटूनच असलेल्या बेहराम पाडा, अहमद झकारिया नगरमधील गल्लीबोळात प्रिया दत्त शिरल्या तेव्हा मुस्लिमबहुल भागातील जोष पाहण्यासारखा होता. गुलाबाच्या उधळलेल्या पाकळ्यांमुळे डांबरी रस्ता गुलाबी झाला होता.
एका माणसालाही धड चालता येत नाही, एवढय़ा चिंचोळ्या भागातून जाताना सुरक्षारक्षकाचीही कसोटी लागत होती. भंगारपासून, तयार कपडय़ापर्यंत, वीटा तयार करण्यापासून मासेविक्रीपर्यंत व्यवसाय चालणाऱ्या या भागातून फिरून त्या पुन्हा खेरनगरच्या कोपऱ्यावर पोहोचल्या. मात्र पुढे कुठे जायचे याबाबत कार्यकर्ते गोंधळ घालू लागले. त्यातच तिथे फरहान आझमी यांची नियोजित प्रचारफेरी आली. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी विनंती केल्याने प्रिया दत्त यांना पुन्हा मागच्या गल्लीने जावे लागले. मग स्टेशनकडे जाणारा मोठा रस्ता ओलांडून दोनशे कार्यकर्त्यांचा जमाव एचडीआयएलच्या बाजूच्या मशिदीच्या गल्लीत घुसला. मात्र केवळ मशिदीला फेरा मारून पुन्हा मुख्य रस्त्यावर यावे लागल्याने प्रिया दत्त यांनी कार्यकर्त्यांना जमवून पुढचा मार्ग ठरवण्याची सूचना दिली. मात्र कोणीही प्रतिसाद देत नसल्याने त्या हताश होऊन स्कायवॉकखालच्या पदपथावरील बाकावर डोक्याला हात लावून बसल्या.  काहींनी त्यांच्या डोक्यावर झेंडा धरून सावली केली. मग कोणत्यातरी पदाधिकाऱ्याने मार्ग सांगितला. पुन्हा कार्यकर्त्यांना घेऊन, रस्ता ओलांडून बेहरामपाडय़ातील जुन्याच मार्गाने प्रिया दत्ता जाऊ लागल्या तेव्हा स्थानिक मतदारांच्या चेहऱ्यावरही प्रश्नचिन्ह उमटले होते. तासाभरापूर्वी रस्त्यावर उधळलेल्या पाकळ्याही सुकून गेल्या होत्या.
दुपारच्या रणरणत्या उन्हात दीड तास एकाच ठिकाणी फिरत असल्याने प्रिया दत्त यांचा संयम सुटला. स्टेशनजवळच्या रस्त्यावर पदयात्रा बाहेर पडली तेव्हा कार्यकर्त्यांचा निरोप न घेताच त्या सुरक्षारक्षक आणि एक मदतनीस यांना घेऊन वांद्रे स्थानकावरील उत्तरेच्या पादचारी पुलावरून निघाल्या.
कमी वर्दळीच्या या पुलावरही प्रवासी त्यांच्याकडे माना वळवून पाहत होते. मात्र अगदी शांतपणे पूल ओलांडून त्या पश्चिमेकडे गेल्या.
तिथे त्यांच्या सुरक्षा रक्षकाने रिक्षा थांबवली तेव्हा चालकाच्या चेहऱ्यावरही आश्चर्य उमटले होते. मात्र एक शब्दही न बोलता त्या रिक्षातून निघून गेल्या तेव्हा अलीकडे बेहराम पाडय़ाच्या बाहेरच्या रस्त्यावर कार्यकर्ते ‘नेमके काय झाले व त्यात कोणाचा दोष’ याची चर्चा करत उभे होते.
भंगारचा उल्लेख नको..
बेहरामपाडाच्या गल्लीतून जाताना युवक काँग्रेसचे कार्यकर्ते जोरदार घोषणा करत होते. त्यातच एकाने आवाज दिला, प्रिया दत्त अंगार है, बाकी सब भंगार है.. हे ऐकून दुसऱ््याने त्याचे तोंड दाबले. ही घोषणा इथे देऊ नको, असे त्याला सांगण्यात आले. बेहराम पाडय़ात भंगारच्या व्यवसायावर अनेकांची रोजीरोटी अवलंबून आहे, त्यामुळे या घोषणेचा विपर्यास होऊ शकतो, याची कल्पना बहुधा कार्यकर्त्यांना आली असावी.