आपल्या गल्लीत कुणी नेता आला की त्याच्यासमोर तुंबलेली गटारे, पाणी, खड्डे, कचरा यांच्याविषयीच तक्रारीचा पाढा ऐकवायचा असा जणू नियम बनून गेला आहे. या गल्लीच्या समस्या जेव्हा दिल्लीतल्या नेत्याला ऐकाव्या लागल्या की जी अडचण होते ती नुकतीच काँग्रेसचे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय निरूपम यांची मालाडमधील मढ, डोंगरपाडा आदी कोळ्यांच्या गावठाणांमध्ये फिरताना झाली.
खरेतर गेल्या निवडणुकीपर्यंत ही गावठाणं शिवसेनेचे गडकिल्ले म्हणून ओळखली जायची. पण, आता इथले चित्र पूर्णपणे पालटून गेले आहे. इथल्या मढ गावासह पास्कलवाडी, वणिला तलाव, एरंगळ आदी गावठाणांमध्ये ‘हाता’ने आपले पाय पसरले आहेत. त्यामुळे, इथल्या सर्वच गावठाणांमधून निरूपम यांना जोरदार प्रतिसाद मिळाला. पण, खासदारासमोर तक्रारींचा पाढा वाचला गेला तो गल्लीतल्या तक्रारींचाच.
अंधेरीला लोखंडवालामध्ये राहणारे निरूपम येथे उतरले ते थेट वर्सोवा-मढ दरम्यान चालविल्या जाणाऱ्या बोट फेरीतून. सकाळी १०च्या सुमारास त्यांची बोट मढ जेट्टीला लागली. इथल्या उत्साही कार्यकर्त्यांनी ढोलताशांच्या, फटाक्यांच्या कडकडाटात खासदारसाहेबांचे स्वागत केले. तिरंगी साडय़ा ल्यायलेल्या काही महिला कार्यकर्त्यां लगबगीने साहेबांचे औंक्षण करण्यासाठी पुढे सरसावल्या. मग औंक्षणाचा रतीब पुढे साहेबांचे कपाळ भरेपर्यंत सुरूच राहिला. खासदार साहेब रथावर विराजमान झाले. पण, इथल्या गावठाणासमोर उभे राहिले की पुढचा प्रचार रथातून शक्य नाही, हे इथल्या गल्लीबोळांची रचना पाहिल्यावर लक्षात येते. मग आपोआपच ते रथातून उतरून चिखल तुडवत गल्ल्यांच्या रस्त्याला लागतात.
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा, खास करून महिलांचा उत्साह भारी. ‘निरूपमजी आगे बढो..’च्या घोषणांनी महिला कार्यकर्त्यां गल्ल्या दणाणून सोडतात. ओळखीची बाई दिसली की, ‘घाल की चप्पल आणि ये बाहेर,’ म्हणून तिलाही आपल्यात सहभागी करून घेत होत्या. लहानथोरांच्या हातात काँग्रेसचा पंजा असलेल्या टोप्या, उपरणी, छोटे फलक, जाहीरनामा, पत्रके थोपविले जाते. समोर येईल त्याला हात जोडत, हात दाखवत निरूपम गल्लीची पदयात्रा सुरू करतात. हाताचा पंजा लक्षात आहे ना.. बोट कुठल्या बटणावर दाबायचे.. याची आठवण सोबत असलेले आमदार अस्लम शेख करून देत असतात.
काही ठिकाणी औंक्षणासाठी म्हणून प्रचारफेरी थांबते. साहेबांचा गळा हारतुऱ्यांनी भरून जातो. तर अंगातला सदरा घामाने निथळू लागतो. इवल्याशा गल्ल्यांमधल्या एकमजली घरांच्या गच्चीतून पोरं उत्सुकतेने खालची गंमत पाहत असतात. खासदार साहेब हात दाखवून गळ्यातला हार, फुलं त्यांच्यावर भिरकावतात. तेवढय़ात वेळ साधून एक अंगापिंडाने मजबूत असलेल्या बाई खासदारांना अडवून तावातावाने गल्लीतल्या तक्रारींचा पाढा वाचू लागतात. त्यावर अहो ताई, हे माझे काम नाही.. ते काम तुमच्या नगरसेवकांचे.. अशी आठवण निरूपम करून देतात. पण, त्या ताई काही मनावर घ्यायला तयार नाहीत. मग, कुणीतरी येऊन त्यांना आवरतं. गर्दी पुढे सरकते.
आडव्या-तिडव्या गल्ल्यांमध्ये माशांचे काटे, खवले यांची रांगोळी फुललेली असते. वाळवणीला टाकलेल्या माशांचा घमघमाट वातावरणात भरून राहिलेला असतो. बायामाणसं आपापली कामे सांभाळत खासदारांनी केलेल्या नमस्काराला उत्तर देत असतात. जेवणाची वेळ असल्याने काही घरांमधून ‘म्हावरं खाऊन जा,’ असा आग्रह होतो. त्यावर ‘आत्ता नको, पण, निवडून आल्यावर भरलेलं पापलेट खायला नक्की येईन,’ असे सांगत खासदारसाहेब पुढच्या गल्लीत वळतात. तितक्यात एका गल्लीत पुन्हा त्याच बाई खासदारांची वाट अडवितात. पुन्हा तोच पाढा सुरू. त्यांना आवरण्यासाठी मग निरूपम तिचे पायच धरतात. अहो..ताई तुमच्या कामांची यादी आमच्या आमदारांकडे द्या, असे सांगत अस्लम शेख यांच्याकडे बोट दाखवितात.
समोरच्या गावात हाच गल्लीच्या समस्यांचा पाढा ऐकावा लागतो. तिथेही कामांची यादी आमच्या कार्यकर्त्यांकडे द्या, असे सांगून निरूपम निघतात. प्रचाररथात बसून पुढचे गाव गाठतात. आधीच्या दोन गावातून फिरून बाहेर येईपर्यंत एक वाजून गेलेला असतो. त्यामुळे, शेख यांना ते बजावतात की, ‘इथून बाहेरच कार्यकर्त्यांना भेटून निघेन.’ पण, गावातले कार्यकर्ते कसले? ते त्यांना बळजबरीनेच गल्ल्यांमधून फिरून आणतात. बॅन्जोच्या तालावर काही उत्साही महिला खासदार आणि आमदारांचा हात धरून त्यांनाही ठेका धरायला लावतात.
प्रचार फेरीच्या या उत्साहाची सांगता शेवटच्या केवळ म्हात्रे कुटुंबांची वसाहत असलेल्या एरंगळ गावात होते. ‘या महिलांच्या गॅसचा प्रश्न आम्ही मार्गी लावला. त्यामुळे, एरवी कधीही पक्षीय राजकारणात सहभागी न होणाऱ्या इथल्या महिला काँग्रेसचे काम करू लागल्या आहेत,’ असे आमदार शेख आवर्जून सांगतात. अवघ्या ५०-६० कुटुंबांची वसाहत असलेल्या गावातून प्रचारफेरी निघते. तोपर्यंत दोन वाजून गेलेले असतात.
संग्राम दिल्लीचा, तक्रारींचा पाढा गल्लीचा!
आपल्या गल्लीत कुणी नेता आला की त्याच्यासमोर तुंबलेली गटारे, पाणी, खड्डे, कचरा यांच्याविषयीच तक्रारीचा पाढा ऐकवायचा असा जणू नियम बनून गेला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 22-04-2014 at 01:06 IST
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election campaign of sanjay nirupam