छायाचित्रासह मतदार याद्यांच्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमाला १६ सप्टेंबरपासून जिल्ह्य़ात सुरुवात झाली असून नागरिकांच्या सर्व सोयीसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी दररोज सकाळी ९ ते १२ मतदान केंद्रात हजर राहावे आणि उर्वरित वेळेत आपले कार्यालयीन कामकाज करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिल्या.
‘लोकसत्ता’ने मतदान केंद्रावर अधिकारी हजर राहात नसल्याचे वृत्त प्रकाशित करताच जिल्हाधिकाऱ्यांनी हे निर्देश दिले आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार चंद्रपूर जिल्ह्य़ातील चंद्रपूर, राजुरा, बल्लारपूर, ब्रम्हपुरी, चिमूर व वरोरा या सहाही विधानसभा मतदार संघातील याद्यांच्या १ जानेवारी २०१४ या अर्हता दिनांकावर आधारित संक्षिप्त पुनरिक्षणाचा  कार्यक्रम   १६  सप्टेंबर पासून सुरू झाला आहे.
हा कार्यक्रम १७ ऑक्टोबपर्यंत राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमानुसार मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासंबंधी नमूना ६, आक्षेपासंबंधी नमूना ७, चुकांची दुरुस्तीसाठी नमूना ८ व नोंदीच्या स्थानांतरकरिता नमुना ८ अ भरून घेण्यात येणार आहे. मतदारांकडून अर्ज स्वीकारण्यासाठी मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे.
या अधिकाऱ्यांनी नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवर कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी उपरोक्त कालावधीत दररोज सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत हजर राहण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. २९ सप्टेबर ते ६ ऑक्टोबर या रविवारच्या दिवशी विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, या दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ५.३० पर्यंत पूर्ण वेळ ठरवून दिलेल्या मतदान केंद्रावर न चुकता हजर राहून दावे व हरकती स्वीकाराव्यात, तसेच मतदार यादी पुनरिक्षण संबंधी कामकाज करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

Story img Loader