लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होऊन महिनाभराचा कालावधी लोटला असला तरी निवडणूक यंत्रणा अद्याप आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी कसरत करत असल्याचे दिसत आहे. राजकीय पक्षांचे फलक व भिंतीपत्रके काढणे तसेच कोनशिला झाकणे यांसारखी अनेक कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. जिल्ह्यात आतापर्यंत थोडी थोडकी नव्हे तर ,तब्बल १५ हजार ५०० फलक काढण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक शाखेने दिली आहे.
निवडणूक आयोगाने ५ मार्च रोजी लोकसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्या दिवसापासून आचारसंहिता लागू झाली. जिल्हा निवडणूक शाखेने तातडीने फर्मान काढून राजकीय पक्ष व पदाधिकाऱ्यांचे फलक व झेंडे काढणे, शासकीय विकास कामांवरील कोनशिला झाकून ठेवण्याचे निर्देश दिले. त्यानुसार शासकीय यंत्रणेने काम सुरू केले खरे, परंतु, महिना उलटला तरी ते पूर्ण झालेले नाही. आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी उपरोक्त कामांसाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. इतका कालावधी होऊनही ही मोहीम अद्याप सुरूच आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३७२ ‘होर्डिग्ज’, १५,५९९ कापडी फलक, १११० ‘बोर्ड’, ३६२७ झेंडे, ५१५ भित्तीपत्रके, ६२० ‘पोस्टर्स’ हटविण्यात आली आहेत. या व्यतिरिक्त शासकीय विकास कामांच्या ठिकाणी असणाऱ्या १४१ कोनशिला कापड वा तत्सम पध्दतीने झाकून ठेवण्यात आल्या आहेत. आतापर्यंत हटविलेल्या फलकांचा अंदाज घेतल्यास नाशिक जिल्ह्याचे राजकीय पक्ष व पदाधिकाऱ्यांनी किती विद्रुपीकरण केले ते सहजपणे लक्षात येते. महिनाभरापासून ही मोहीम सुरू असली तरी हे काम पूर्णत्वास गेले असे निवडणूक यंत्रणेने म्हटलेले नाही. बहुदा निवडणुकीचा निकाल लागत नाही, तोपर्यंत ही विशेष मोहीम सुरू राहण्याची शक्यता आहे.