देशात सुमारे ८० कोटी मतदार असून त्यापैकी सुमारे साठ कोटी हे नवमतदार आहेत. मतदान करण्याचा प्रत्येकाचा हक्क आणि कर्तव्य असून मतदानाचे प्रमाण वाढावे असे निवडणूक आयोगाचे प्रामाणिक मत असून यंदा ७० टक्के मतदान व्हावे, असे निवडणूक आयोगाचे लक्ष्य असल्याचे निवडणूक आयोगाचे नागपूर लोकसभा निवडणूक आयोगाचे निरीक्षक रवींद्रनाथ मिश्रा यांनी सांगितले.
गेल्या निवडणुकीत काही मतदारसंघात तसेच मतदान केंद्रांवर अत्यल्प मतदान झाले होते. मतदानाचे प्रमाण सत्तर टक्क्यांपर्यंत वाढावे, असा प्रयत्न निवडणूक आयोग करीत आहे. ‘सिस्टिीमॅटिक व्होटर्स एज्युकेशन अँड इलेक्ट्रोल पार्टिसिपेशन’ अशी ही योजना आहे. नवीन मतदारांची नोंदणी वाढावी, हा त्याचाच एक भाग आहे. त्यासाठी जनजागृती केली जात आहे. नागपूर लोकसभा मतदार संघात विविध महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यात आली. १८ ते ३५ वयोगटातील या नवमतदाराला मतदान यादीत नाव नोंदणी व प्रत्यक्ष मतदानासाठी प्रोत्साहित करण्याची गरज आहे. त्यासाठी रविवारी देशभरात विशेष अभियान घेण्यात आले. २४ मार्चपर्यंत मतदार यादीत नाव नोंदणी केली जाणार आहे. ‘ईसीआय.एनआयसी.ईन’ या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल. या सर्वांची नावे पुरवणी मतदार यादीत समाविष्ट केली जातील.
मतदान नोंदणी व त्यासंबंधी माहितीसाठी शहरी भागात महापालिकेच्या प्रत्येक वॉर्ड कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभाग, ग्रामीण भागात उपविभागीय अधिकारी व तहसीलदार कार्यालय येथे संपर्क साधता येईल. मतदार नोंदणी, मतदार यादीत नाव पाहणे, मतदान केंद्र कुठे आहे किंवा निवडणुकीसंबंधी (निकाल सोडून) काहीही माहिती हवी असल्यास १८००२३३१९०५ या टोल फ्री किंवा ०७१२- २५४९८४७ या क्रमांकावर संपर्क साधता येईल. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर इतरही अधिकाऱ्यांचे क्रमांक दिले जातील. नाव, पत्ता एसएमएस केला की मतदान केंद्र व क्रमांकाचा एसएमएस दिला जाईल. याशिवास संकेतस्थळावरही तशी सोय करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा व जिल्हा माहिती अधिकारी अनिल ठाकरे पत्रकार परिषदेला उपस्थित होते.