राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी माघारीची मुदत संपुष्टात आल्यानंतर उमेदवारांना प्रचारासाठी सर्वात कमी म्हणजे १५ दिवसांचा कालावधी नाशिक व दिंडोरीसह उत्तर महाराष्ट्रातील सहा लोकसभा मतदारसंघात मिळणार आहे. निवडणूक काळात ‘सोशल मीडिया’वर प्रामुख्याने नजर ठेवली जाणार आहे. या माध्यमातून प्रलोभन दाखविण्याचे अथवा जाती-धर्माच्या आधारावर विद्वेष पसरविण्याचे प्रयत्न होऊ शकतात. ही बाब लक्षात घेऊन राजकीय पक्षांनाही त्यांचे ब्लॉग, कम्युनिटी यांची माहिती आधी सादर करावी लागणार आहे.
निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकारी विलास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी संबंधितांना आदर्श आचारसंहिता, उमेदवाराच्या खर्चाचे द्यावे लागणारे तपशील, या काळात काय करावे व काय करू नये याबाबतच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे शंकानिरसन करण्यात आले. नाशिक जिल्ह्यात १५ विधानसभा मतदारसंघ असून नाशिक व दिंडोरी असे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी तीन विधानसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत. निवडणूक कार्यक्रमावर नजर टाकल्यास राज्यात प्रचारास सर्वात कमी कालावधी मिळणारे हे मतदारसंघ असल्याचे लक्षात येते. निवडणुकीची अधिसूचना २९ मार्च रोजी निघणार आहे. त्यानंतर ५ एप्रिलपर्यंत अर्ज भरण्याची मुदत असून ९ एप्रिलपर्यंत माघारीची मुदत आहे. त्यानंतर २४ एप्रिल रोजी मतदान होईल. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ‘मीडिया सर्टिफिकेशन अ‍ॅण्ड मॉनिटरिंग’ समितीची स्थापना करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया योग्य पध्दतीने पार पाडण्यासाठी प्रत्येक विषयासाठी एक यानुसार १५ नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या छायाचित्र मतदार यादी अद्ययावतीकरणात एक लाख ७१ हजार ३७८ मतदारांची नव्याने नोंदणी करण्यात आली. या निवडणुकीसाठी जिल्ह्यात पुरेसे मतदान यंत्र उपलब्ध आहेत. कंट्रोल युनिटची संख्या ४६१० व ४६१० बॅलेट युनिट लागणार आहेत. ४,११० मतदान केंद्रांसाठी केंद्र व राखीव पथके यासाठी २३ हजार ५० मतदान कर्मचारी लागणार आहेत. उमेदवाराच्या खर्चाबाबतची माहिती सर्वसामान्यांनाही ‘टोल फ्री’ क्रमांकावरून घेता येईल.

मतदारसंघनिहाय मतदारसंख्या
नाशिक लोकसभा मतदारसंघात मतदारांची एकूण संख्या १५ लाख ४५ हजार ५६४ इतकी आहे. त्यात आठ लाख २४ हजार ९६३ पुरूष तर सात लाख २० हजार ६०१ महिला आहेत. दिंडोरी मतदारसंघात सात लाख ९२ हजार पाच पुरूष तर सात लाख नऊ हजार ४० महिला असे एकूण १५ लाख दोन हजार ३५ मतदार आहेत. धुळे मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. या मतदारसंघात सात लाख, ५१ हजार २६ मतदार आहेत. त्यात तीन लाख ९६ हजार ५९२ पुरूष तर ६ लाख ६४ हजार २६ महिला मतदार आहेत.

Story img Loader