आग ओकत असलेल्या सूर्यामुळे तपमान दर्शक यंत्रातील ४७ अंशापर्यंत पोहोचलेला पारा आणि त्यामुळे शराराची होणारी काहिली, जलस्त्रोतांची झपाटय़ाने खालावत चाललेली पातळी परिणामी त्यामुळे मतदारसंघातील ७० गावांमध्ये निर्माण झालेली तीव्र पाणी टंचाई, लग्नसराईचा मोसम.. तशातच वीज भारनियमनामुळे त्रस्त झालेली जनता.. या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम यवतमाळ विधानसभा पोटनिवडणुकीवर होणार असून सर्व राजकीय पक्षांना प्रचार कसा करावा व मतदारांना मतदानासाठी मतदानकेंद्रावर कसे न्यावे, या चितेंने चांगलेच ग्रासले आहे.
येत्या २ जूनला यवतमाळ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुक होणार आहे. कोणत्याही पक्षाने अद्याप उमेदवार जाहीर करण्याची घाई केलेली नसली तरी भाजपमध्ये माजी आमदार मदन येरावार यांना उमेदवारीची शंभर टक्के खात्री असल्याने त्यांनी प्रचार दौरे सुरू केले आहेत. तर काँग्रेसनेही उमेदवारी कुणाला मिळते याची वाट न पाहता मतदारांच्या घरोघरी जाऊन मतांचा जोगवा मागणे सुरू करा उन्हाची पर्वा करू नका, पंधरा दिवस त्रास सोसला तर पाच वर्ष चन करता येईल असा अलिखित संदेश इच्छुकांना दिला आहे.
काँग्रेस आमदार नीलेश पारवेकर यांचे २७ जानेवारीला अपघाती निधन झाल्याने ही पोटनिवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया गुरुवारपासून सुरूझाली असून १५ मे पर्यंत चालणार आहे.
प्रशासनाने निवडणुकीची तयारी पूर्ण केल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली आहे. कायदा आणि व्यवस्था देखील परिपूर्ण असल्याचे व संवेदनशील मतदान केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्ताची तयारी असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी दिली आहे. ही पोटनिवडणूक काँग्रेस आणि भाजपा हे दोन्ही पक्ष गांभीर्यानेच लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे कारण, २०१४ साली होणाऱ्या विधानसभा निवडणूकांच्या पाश्र्वभूमीवर मतदारांचा कौल यातून ध्वनित होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची काँग्रेससोबत आघाडी कायम ठेवण्याच्या शरद पवारांच्या घोषणेमुळे राकाँच्या स्थानिक नेत्यांना आत्म्याच्या आवाजाला कैद करून काँग्रेससाठी काम करावे लागणार आहे. त्यासाठी काँग्रेसला राष्ट्रवादीच्या अटी मानाव्या लागतील हेही स्पष्ट आहे. त्यामुळे कॉग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या विळ्या-भोपळयाच्या सख्ख्याचा लाभ कसा उखडता येईल, यावर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. दुसरीकडे भाजपातही गटबाजी टोकाला गेली आहे. या गटबाजीचा फायदा उचलण्याची रणनिती काँग्रेसदेखील आखत आहे.
निवडणूक तोंडावर आली असली तरी कोणत्याही पक्षाने अजून जाहीरनामा प्रसिध्द केला नाही. २००९ चा जुनाच ‘जाहीरनामा-२ लोकांना दाखवा’, असे काँग्रेस आणि भाजपचे धोरण आहे. निवडणूक आचारसंहितेच्या कठोर पालनामुळे आणि उमेदवारांची नावे राजकीय पक्षांनी अजून जाहीर केली नसल्यामुळे कुठेही भिंती रंगलेल्या नाहीत, होर्डिग्ज, फलक, बॅनर्स, पोस्टर झळकलेले नाहीत अथवा निवडणुक चिन्हांचे बिल्ले व साहित्य घेऊन कार्यकर्ते धडकले नाहीत. येत्या १८ मे नंतरच निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग येईल कारण तेव्हा निवडणुक चित्र स्पष्ट झालेले दिसेल. तोपर्यंत या मतदारसंघातील ४२ नव्या गावांसह एकूण ११५ गावातील ३ लाख १९ हजार ८२० मतदारांसाठी ‘वेट अँण्ड वॉच’ ची स्थिती आहे. वाघापूर ,उमरसरा, तळेगाव ,वडगांव ,चिचघाट , येळाबारा , हिवरी अकोला बाजार , तिवसा, रुई, दारव्हा आणि लाडखेड या जिल्हा परिषद सर्कलमधील गावांमध्ये जाऊन आग ओकत असलेल्या सूर्याच्या साक्षीने प्रचार करणे हे एक अग्निदिव्यच ठरणार आहे.
आग ओकणाऱ्या सूर्याच्या साक्षीने प्रचाराचे अग्निदिव्य
आग ओकत असलेल्या सूर्यामुळे तपमान दर्शक यंत्रातील ४७ अंशापर्यंत पोहोचलेला पारा आणि त्यामुळे शराराची होणारी काहिली, जलस्त्रोतांची झपाटय़ाने खालावत चाललेली पातळी परिणामी त्यामुळे मतदारसंघातील ७० गावांमध्ये निर्माण झालेली तीव्र पाणी टंचाई, लग्नसराईचा मोसम..
First published on: 11-05-2013 at 03:26 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election compaign in the witness of hotest sun