शहर व तालुक्यात भीषण दुष्काळ असताना राष्ट्रवादी काँग्रेसने नगरपरिषदेची पोटनिवडणूक लादली असल्याचे प्रतिपादन आमदार अशोक काळे यांनी जनसेवा आघाडीच्या दिनार कुदळे यांच्या निवडणूक प्रचार प्रसंगी केले.
नगरसेवक पुरब कुदळे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या कोपरगाव नगरपरिषद प्रभाग क्र. २ ब च्या पोटनिवडणुकीचा शुभारंभ आमदार अशोक काळे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.
काळे पुढे म्हणाले, शहर व तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती, शेकडो प्रलंबित कामे आदी समस्यांमुळे ही निवडणूक घेणे गैर होते. परंतु कुदळे कुटुंबीयांच्या दोन पिढय़ांनी माजी मंत्री शंकरराव कोल्हे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आपले सर्वस्व पणाला लावले. त्यांच्या निधनानंतरच्या शोकसभेत जाहिररीत्या कोल्हे कुटुंबीयांनी कुदळे कुटुंबीयांनी पोटनिवडणूक लढविल्यास राष्ट्रवादी उमेदवार उभा करणार नसल्याची ठाम ग्वाही दिली होती. परंतु आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीने आपला उमेदवार उभा करून ही पोटनिवडणूक लादली.