महापालिकेच्या तीन झोनच्या सभापतीपदासाठी बुधवार, १६ जानेवारी रोजी निवडणूक होऊ घातली आहे. या पदासाठी अनेक इच्छुक असल्याने कॉंग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना व अपक्ष नगरसेवकांमध्ये कमालीची चुरस असून उद्या अर्ज दाखल करायचे असून ३० अर्जाची विक्री झालेली आहे.
महापालिकेचे कामकाज अधिक सोयीचे व्हावे यासाठी १ जानेवारीपासून शहरात तीन स्वतंत्र झोन कार्यालये अस्तित्वात आली. यातील प्रत्येक झोनमध्ये २२ नगरसेवक, एक सभापती, एक उपायुक्त दर्जाचा कनिष्ठ अभियंता, दोन सफाई निरीक्षक, दोन अस्थायी सदस्य व कर्मचाऱ्यांचा समावेश राहणार असून पाच लाखाच्या कामाचे अधिकार समितीला आहेत. झोन क्रमांक १ चे कार्यालय संजय गांधी व्यापार संकुल, नागपूर मार्ग येथे राहणार असून कनिष्ठ अभियंता म्हणून रवी हजारे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर सफाई निरीक्षक म्हणून उदय मैलारपवार, संतोष गर्गेलवार यांच्याकडे जबाबदारी आहे. या झोनमध्ये तुकूम, सिव्हील लाईन, जटपुरा, घुटकाळा, अशा अकरा प्रभागातील एकूण २२ नगरसेवकांचा समावेश आहे. झोन क्रमांक दोनचे कार्यालय आचार्य कृपलानी शाळा, शिवाजी चौक येथे राहणार आहे. झोन क्रमांक एकचे कार्यालय सुरू झाले असले तरी दोन व तीन झोनचे कार्यालय अजूनही सुरू झालेले नाही. या प्रभागाची जबाबदारी कनिष्ठ अभियंता राजीव पिंपळशेंडे यांच्याकडे आहे. सफाई निरीक्षक म्हणून अविनाश राऊत व विवेक पोतनुरवार काम बघतील. या झोनमध्ये अंचलेश्वर, भानापेठ, बाजार वॉर्ड, विठ्ठल मंदिर, पठाणपुरा, अशा एकूण अकरा प्रभागातील २२ नगरसेवक राहतील, तर झोन क्रमांक तीनचे कार्यालय देशबंधू चित्तरंजन दास प्रा. शाळा, बंगाली कॅम्प येथे राहणार आहे. त्याची जबाबदारी कनिष्ठ अभियंता मोरेश्वर वनकर यांच्याकडे असून सफाई निरीक्षक म्हणून विजय मोगरे, मधुसूदन दिंगलवार आहेत. या झोनमध्ये शास्त्रीनगर, एमईएल, इंदिरा नगरपासून, तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर अशा अकरा प्रभागातील २२ नगरसेवकांचा समावेश आहे.
या तिन्ही प्रभागात लोकशाही पध्दतीने एक सभापतीची निवड करण्यात येणार आहे, तर दोन अशासकीय सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. यात डॉक्टर, अभियंता, वकील व स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधींना प्राधान्य देण्यात येणार आहे.  प्रत्येक झोनला प्रत्येकी पाच लाखाचे काम वाटपाचे अधिकार आहे. झोन सभापतीपदासाठी बुधवार १६ जानेवारी रोजी निवडणूक होत आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १५ जानेवारी आहे. त्यामुळे कॉंग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना व अपक्षांच्या गटनेत्यांनी आजच अर्ज घेऊन ठेवले. आज एकाच दिवशी ३० अर्ज विकले गेले. प्रभाग क्रमांक एकसाठी भाजपचे गटनेता वसंता देशमुख, देवानंद वाढई, राष्ट्रवादीचे संजय वैद्य, कॉंग्रेसचे संतोष लहामगे व महेंद्र जयस्वाल यांनी १२ अर्ज घेतले, तर झोन दोनसाठी ११ व झोन क्रमांक तीनसाठी अपक्ष प्रदीप डे ३, मनोरंजन रॉय, राजकुमार उके, विनय जोगेकर, महानंदा वाळके, अनिल रामटेके, संतोष लहामगे व संजय वैद्य यांनी १७ अर्ज घेतले. पालिकेत कॉंग्रेसने शिवसेना व अपक्षांना सोबत घेऊन सत्ता हस्तगत केली आहे. असे असले तरी झोन क्रमांक एकमध्ये कॉंग्रेसचे नगरसेवक कमी असल्याने भाजप व शिवसेनेने दावा सांगितला आहे.
त्यात ज्येष्ठ कॉंग्रेस नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांनी कॉंग्रेस नगरसेवकांची बैठक घेऊन तिन्ही झोनसाठी अनुक्रमे महेंद्र जयस्वाल, अनिता कथडे व अनिल रामटेके यांची नावे जाहीर केली आहेत. त्यामुळे कॉंग्रेससोबत सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना व अपक्षांची अडचण झाली आहे. तिकडे भाजप, राष्ट्रवादी व काही अपक्षांनी वेगळेच गणित मांडले आहे. एकूणच या सभापतीपदाच्या निवडीवरून पालिकेत सध्या चांगलीच चुरस रंगली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा