‘साहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणूक पद्धतीचा सगळा प्रकार गलिच्छ, घाणेरडा आणि लज्जास्पद आहे’ असे विधान अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार ह. मो. मराठे यांनी नुकतेच केले.
अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतून झालेल्या ‘असंही एक साहित्य संमेलन’ या कार्यक्रमात ह. मो. मराठे बोलत होते. साहित्य संमेलन अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान निर्माण झालेले वादंगामुळे निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार ह. मो. मराठे यांची भूमिका लोकांसमोर यावी या उद्देशाने अशोक मुळ्ये यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करून ‘बोला ह. मो. बोला’ या शीर्षकांतर्गत ह. मों.ची मुलाखत घेण्यात आली. विशेष म्हणजे रामदास पाध्ये यांनी आपला बोलका बाहुला अर्धवटरावासह ही मुलाखत घेतली. ह.मो. म्हणाले की, असे अनेक ज्येष्ठ साहित्यिक आहेत, ज्यांचे कर्तृत्व संमेलनाध्यक्षपद मिळविण्याचे आहे. पण त्यांना संमेलनाध्यक्ष केले गेले नाही. बेळगावसारखा प्रांत, तिथल्या इंदिरा संत यांनाही संमेलनाध्यक्ष केले नाही. वि. ग. कानिटकर, रत्नाकर मतकरी असे कितीतरी साहित्यिक आहेत की ज्यांना सन्मानाने संमेलनाध्यक्ष करायला हवे, असेही मत त्यांनी मांडले.
अत्यंत अनौपचारिक पद्धतीने झालेल्या या कार्यक्रमात संकल्पक-आयोजक यांनी ‘असंही एक साहित्य संमेलन’ आयोजित करण्यामागची भूमिका विषद करताना शाब्दिक फटकेबाजी केली. संमेलनाच्या स्वागताध्यक्ष प्रा. प्रतिमा इंगोले यांनी आपल्या लेखनामागची भूमिका स्पष्ट केली. सभोवतालचे वातावरण, आपले अनुभव, स्त्रियांना मिळणारी दुय्यम वागणूक, अपमानास्पद वागणूक, पुरुषसत्ताक पद्धतीतून पुढे येताना करावा लागलेला संघर्ष याचा आलेख इंगोले यांनी आपल्या भाषणातून मांडला.
या संमेलनात गीताकर राजा बढे यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या गीतांचा श्रवणीय कार्यक्रम झाला. संमेलनाचे उद्घाटक निवृत्त न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी आपल्या भाषणात ‘आपण घरात मराठीतच बोलू आणि मराठीस हद्दपार होऊ देणार नाही’ अशी शपथच सर्वाकडून वदवून घेतली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा