सुमारे वर्षभरापूर्वी संचालक मंडळाची मुदत संपलेल्या तालुक्यातील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या मतदार याद्या तयार करून जिल्हा उपनिबंधकांकडे सादर करण्याचे निर्देश प्रादेशिक सहसंचालकांनी दिल्यामुळे ऐन दिवाळीत ‘वसाका’ निवडणुकीचे पडघम वाजण्याची चिन्हे आहेत.
सहकार क्षेत्रासाठी महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या ९७ व्या घटनादुरूस्तीमुळे लांबलेल्या सहकारी संस्थांच्या मतदारयाद्या मागवण्यास सुरूवात झाली आहे. त्यात वसाकाचाही समावेश असल्याने सभासदांमध्ये उत्सुकता आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असलेल्या आणि सुमारे चारशे कोटींच्या जवळपास कर्जाचा डोंगर असलेल्या वसाकाची निवडणूक अविरोध होते की बहुरंगी का आहेरद्वयींमध्ये होते हे लवकरच स्पष्ट होईल.
वसाकाच्या संचालक मंडळाची मुदत ही डिसेंबर २०१२ मध्ये संपुष्टात आली. केंद्र शासनाच्या ९७ व्या घटनादुरूस्तीमुळे राज्यातील सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. मात्र, या अनुषंगाने राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण लवकरच गठीत होणार असल्याने संचालक मंडळाची मुदत संपलेल्या सहकारी साखर कारखान्यांच्या उपविधीमध्ये सुधारणा करून घेण्याबाबत व सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करून जिल्हा उपनिबंधकांकडे सादर करण्याचे निर्देश सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था यांनी दिले आहे. त्या आधारे प्रादेशिक सहसंचालकांनी संबंधित कारखान्यांना पत्र पाठविली आहेत.
या घडामोडींमुळे लवकरच मतदार याद्या तयार होऊन त्या जिल्हा निबंधकांकडे सादर करण्याची प्रक्रिया सुरू होईल. नोव्हेंबर महिन्यात वसाकाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागतील. त्यामुळे वसाका कार्यक्षेत्रात राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात होणार
आहे.