विधानसभा निवडणुकीला जवळपास दोन महिन्यांचा कालावधी असला तरी विविध राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. आघाडी आणि महायुतीमधील विविध राजकीय पक्षांतील कार्यकत्यार्ंनी स्वबळावर निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी वरिष्ठ नेत्यांना ते मान्य नसल्यामुळे आघाडी आणि महायुती निवडणूक लढणार आहे हे जवळपास निश्चित झाले आहे. यावेळी जागावाटपामुळे मोठय़ा प्रमाणात विविध राजकीय पक्षांमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता आहे त्यामुळे निवडणूक रंगतदार आणि चुरशीची होणार असल्याची चिन्हे आहेत. भाजपने शहरात आणि जिल्ह्य़ात मिळालेल्या यशामुळे पूर्व विदर्भात सर्वच जागा लढवण्याची मागणी केली असतानाच शिवसेना अधिक आक्रमक होऊन शहरात आणि जिल्ह्य़ात किमान पाच ते सहा जागा मिळाव्या यासाठी आग्रही आहे त्यामुळे महायुतीमध्ये जागा वाटपावरून घमासान होण्याची चिन्हे आहेत
भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, मनसे, शिवसेना आणि बहुजन समाज पक्षाच्या राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी विदर्भासह उपराजधानीकडे लक्ष केंद्रित केले असून त्याचाच भाग म्हणून या राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या दृष्टीने पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांंच्या आढावा बैठकी घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. विदर्भातील विविध मतदारसंघावर भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बसपा, शिवसेना, मनसे आदी राजकीय पक्षातील इच्छुकांनी दावे केल्यामुळे यावेळच्या निवडणुकीत उमेदवारी मिळण्यावरून घमासान होण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीचे सदस्य विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि माजी अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी पूर्व विदर्भातील विविध जिल्ह्य़ांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकी घेऊन निवडणुकीच्या दृष्टीने आढावा घेतला. भाजपच्या अनेक प्रस्थापित आमदारांसह काही पदाधिकाऱ्यांनी यावेळी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली. दक्षिण नागपूर मतदारसंघात शिवसेनेचा दावा असताना आणि त्यांनी नुकतीच तशी घोषणा केली आहे. मात्र दुसरीकडे भाजपचे काही पदाधिकारी दक्षिण नागपूरसाठी आग्रही आहेत, त्यामुळे या मतदारसंघात बंडखोरी होण्याची जास्त शक्यता आहे. याशिवाय मध्य, पश्चिम नागपूर प्रस्थापित आमदारांना वगळून नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. मात्र, आमदार विकास कुंभारे मध्य नागपूर सोडायला तयार नाही. पश्चिम आणि दक्षिण-पश्चिम नागपुरात अनेक दावेदार आहेत. विदर्भातील विविध जिल्ह्य़ांत भाजपमध्ये अशीच परिस्थिती आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला मिळालेल्या यशानंतर अनेकांचा आत्मविश्वास वाढल्यामुळे दावेदारी वाढली आहे. शिवसेनेने शहरात आणि जिल्ह्य़ात सहा जागा मिळाव्या, अशी मागणी केली आहे. दक्षिण नागपूरवर आधीच दावा केला असल्यामुळे त्यांच्या व्यतिरिक्त दुसरा मतदारसंघ मिळावा अशी मागणी आहे. छगन भुजबळ यांचे खंदे समर्थक, राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये दाखल झालेले किशोर कन्हेरे काटोल मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. मात्र, जुन्या कार्यकर्त्यांंचा विचार व्हावा, अशी मागणी पक्षाकडून केली जात आहे.
अखिल भारतीय काँग्रेस समितीचे निरीक्षक विनोद चतुर्वेदी, जेसा मोटवानी यांनी देवडिया भवनात सहाही विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी काँग्रेसमधील विविध गटातील नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी दावे केल्यामुळे उमेदवारी मिळण्यावरून गोंधळ होण्याची शक्यता आहे. पूर्व नागपूरमधून सतीश चतुर्वेदी आणि उत्तर नागपूरमधून नितीन राऊत यांनी पुन्हा उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या दोन्ही नेत्यांना यावेळी विरोध होण्याची शक्यता आहे. तशा तक्रारी वरिष्ठाकडे काही पदाधिकाऱ्यांनी केल्या आहेत. विलास मुत्तेमवार यांचे खंदे समर्थक दक्षिण नागपुराचे आमदार दीनानाथ पडोळे आणि शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. विकास ठाकरे पश्चिममधून लढण्यास इच्छुक आहे. जिल्ह्य़ात काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली नसली तरी त्यांच्याकडे इच्छुकांची संख्या बरीच आहे. राष्ट्रवादीला शहरात दोन आणि जिल्ह्य़ात किमान तीन जागा मिळाव्यात अशी मागणी केली गेली. काही इच्छुकांनी तर आपापल्या मतदारसंघात काम सुरू केले आहे.   
बहुजन समाज पक्षाने पदाधिकाऱ्यांच्या बैठकी घेणे सुरू केले आहे. लोकसभा निवडणुकीत बसपाला देशात एकही जागा मिळाली नसली तरी आघाडी आणि युतीनंतर तिसरा पक्ष म्हणून समोर आला आहे. त्यामुळे या पक्षाकडे दावेदारांची संख्या बरीच आहे. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव व विदर्भ प्रभारी डॉ. सुरेश माने यांनी नुकताच मेळावा घेऊन विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. मतदार संपर्क अभियानावर त्यांचा भर राहणार असला तरी विदर्भाच्या मुद्यावर ते निवडणूक लढणार आहेत.  ज्यांना आघाडी आणि युतीमध्ये उमेदवारी मिळणार नाही असे वाटत आहे असे अनेक पदाधिकारी बसपाकडून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. मनसेने विदर्भात काम सुरू केले असून त्यांचीही निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू  झाली आहे. नागपूर आणि वर्धा मतदारसंघातील आढावा घेण्यासाठी पक्षाचे सरचिटणीस शिरीष सावंत, शिशिर शिंदे, जयप्रकाश बावीस्कर आले होते. यावेळी त्यांनी दोन्ही जिल्ह्य़ाचा आढावा घेतला. प्रत्येक मतदारसंघासाठी किमान दोन ते तीन इच्छुक उमेदवार आहे. ऑगस्टमध्ये पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे नागपुरात येणार असून त्यावेळी विदर्भातील इच्छुक उमेदवारांशी चर्चा करणार आहे.

Story img Loader