महापौर पदासाठी २८ मार्च रोजी निवडणूक होणार असून सत्ताधारी गटातर्फे नगरसेवक किशोर पाटील यांचे नाव निश्चित झाले आहे. विरोधी भाजप आणि राष्ट्रवादी उमेदवार उभा करतात किंवा नाही याची सर्वाना उत्सुकता आहे.
महापौर जयश्री धांडे यांनी आपला नियोजित पाच महिन्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर गेल्याच आठवडय़ात पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त पदासाठी या पंचवार्षिकमधील शेवटच्या पाच महिन्यांसाठी नवीन महापौर निवडण्यासाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. २८ मार्च रोजी महापौर निवडीसाठी सकाळी ११ वाजता विशेष महासभा होणार आहे. इच्छुक उमेदवारांना २२ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. महापौर पदासाठी सत्ताधारी खान्देश विकास आघाडीकडून आपले नाव स्वत: सुरेश जैन यांनीच निश्चित केल्याची माहिती किशोर पाटील यांनी दिली. दुसरीकडे पिंप्राळ्यातील एका भूखंड प्रकरणात पाटील यांचे नाव गोवले जात असल्याने महापौर होण्यासाठी हा अडथळा असल्याचे म्हटले जात आहे.
तथापि त्या प्रकरणाशी आपला कोणताच संबंध नाही. आपण कोणत्याही अडचणीचा सामना करण्यास केव्हाही तयार असल्याचे पाटील यांनी नमूद केले आहे. सत्ताधारी गटातीलच काही असंतुष्ट नगरसेवक विनाकारण तथ्यहीन विषय उपस्थित करीत असल्याचा आरोपही पाटील यांनी केला आहे. पालिकेत जैन गटाकडे बहुमत असल्याने पाटील हेच महापौर होणार हे निश्चित मानले जात असले तरी त्यांची निवड अविरोध होते की विरोधकांच्या वतीने उमेदवार उभा करण्यात येतो, हाच केवळ औत्सुक्याचा विषय आहे.