जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका या अत्यंत महत्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवेळीच ग्रामपंचायतींचाही निवडणूक कार्यक्रम एकाचवेळी जाहीर झाल्यामुळे राजकीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची धावपळ सुरू झाली आहे. शिवसेना, भाजप, काँग्रेस अणि राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांनी उमेदवार देताना शक्य ती काळजी घेतल्याचा दावा केला जातो आहे. पण, राजकीय पक्षांनी किमान राजकारण आणि प्रशासनाची जाण असलेला, शिक्षित उमेदवार द्यावा, अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.
जिल्हा परिषदेच्या ५५ गट आणि पंचायत समितीच्या ११० गण यासह जिल्ह्यातील २४ ग्रामपंचायत आणि धुळे महापालिकेच्या ७० प्रभागांमध्ये निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते जनसंपर्क वाढविण्याबरोबर दुसरीकडे पक्षाचे अधिकृत तिकीट मिळविण्यासाठी व्युहरचना करत आहेत. तिकीट न मिळाल्याने नाराज झालेली काही मंडळी बंडखोरीच्या प्रयत्नात असून त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रशासकीय पातळीवर आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला असून तक्रारकर्त्यांसाठी संपर्क क्रमांकही देण्यात आला आहे. सोमवारपासून जिल्हा परिषद, पंचायत समिती व महापालिका निवडणुकीसाठी नामांकनपत्र उपलब्ध करून ते स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली.
जिल्ह्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विद्यमान सदस्यांची संख्या आणि पक्ष बलाबल पाहता शिवसेना व काँग्रेसमध्ये फारसे अंतर नसल्याचे दिसते. जिल्हा परिषदेच्या ५५ पैकी २७ गटांमधून काँग्रेसचे सदस्य निवडून आले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनेचे १३ सदस्य आहेत. महापालिकेतही १६ सदस्य असलेल्या शिवसेनेने शिंदखेडा पंचायत समितीत नऊ तर धुळे पंचायत समितीत १६ सदस्य दिले आहेत. महापालिका, जिल्हा परिषद आणि चारही पंचायत समित्यांचे बलाबल पाहिल्यास सेनेचे २५ सदस्य जिल्ह्यातील काम करीत आहेत तर काँग्रेसचे ३६ सदस्य आहेत.
धुळे व शिंदखेडा पंचायत समिवीर अनुक्रमे शिवसेना व भाजपची सत्ता आहे. धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचे आ. शरद पाटील तर शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात आ. जयकुमार रावल यांचे वर्चस्व राहिले आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी गटातटाचे राजकारण बाजुला ठेऊन एकदिलाने काम करावे अशी निष्ठांवतांची भावना आहे तर शिवसेना, भाजपप्रमाणे राष्ट्रवादी हा समविचारी पक्षही काँग्रेससमोर आव्हान उभे करू शकतो हेही विसरून चालणार नाही.

Story img Loader