रविवारच्या सुटीची संधी साधत महापालिका निवडणुकीतील सर्वच पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांनीही शहरात आज जोरदार प्रचारफेऱ्या, पदयात्रा काढून रणधुमाळी निर्माण केली. अनेकांनी बँडपथक, ढोल-ताशे वाजवत प्रचाराच्या मिरवणुकाच काढल्या. उमेदवार, पक्षांच्या नावांच्या घोषणांनी, लाऊडस्पीकरवरील प्रचाराच्या गाण्यांनी, आवाहनांनी तर गदारोळच उडवला होता. शहरातील वातावरण अवघे निवडणूकमय झाले आहे. आज विवाहाची तिथही दाट होती. या समारंभांनाही उमेदवारांनी आवर्जून हजेरी लावली.
मतदानास आता अवघा आठवडा उरला आहे. त्यातही एक दिवस आधी जाहीर प्रचाराची समाप्ती होणार आहे. त्यामुळे प्रचाराचे आता केवळ पाच दिवसच उमेदवारांच्या हाती आहेत. मतदानापूर्वीचा हा शेवटचा रविवार. हक्काचा मतदार किमान आज तरी घरीच सापडणार या उद्देशाने उमेदवारांनी घराघरांत जाऊन पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी सकाळीच प्रचारफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले होते. बहुतेक पक्षांनी एक-दोन दिवसांपूर्वीच उमेदवारांना प्रचाराचे साहित्य पोहोच केले आहे. मात्र उमेदवारांनी त्यापूर्वीच, पक्षावर अवलंबून न राहता आपले प्रचारसाहित्य निर्माण केले. प्रचारातून आपली भूमिका मांडणारे, प्रभागांतील प्रश्नांसंबंधी आश्वासने देणारी पत्रके कार्यकर्त्यांमार्फत वाटली जात आहेत. प्रचार करून दमलेल्या कार्यकर्त्यांची क्षुधा शमवण्यासाठी त्या त्या परिसरातील अनेक हॉटेल तुडुंब भरली होती.
आचारसंहितेमुळे बोर्ड, फ्लेक्स, रिक्षा, लाऊडस्पीकर्स यांच्या संख्येवर बंधने आली आहेत, शिवाय त्याच्या परवानगींसाठीही मोठी झंझट कार्यकर्त्यांना करावी लागत आहे. त्यामुळेही उमेदवारांना पदयात्रा व प्रचारफेऱ्यांशिवाय पर्याय राहिलेला नाही. अनेकांनी एसएमएस, सोशल नेटवर्किंगचाही आधार घेतला आहे. या माध्यमातूनही मतदारांशी प्रभावी संपर्क साधला जात आहे. मात्र प्रत्यक्ष भेट अधिक प्रभावी ठरत असल्यानेही उमेदवारांना पायपीट सहन करावी लागत आहे. दुपारच्या काही वेळच्या विश्रांतीनंतर सायंकाळी पुन्हा प्रचारफेऱ्यांना जोर चढला होता. रात्री उशिरापर्यंत मतदारांच्या गाठीभेटींचा सिलसिला सुरू होता.
आत्तापर्यंतच्या प्रचारात मोठय़ा नेत्यांच्या सभा झालेल्या नाहीत. सोमवारपासून विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होत आहे, तिकडेही नेतेमंडळी अडकलेली आहेत. त्यामुळे आता अखेरच्या टप्प्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, गोपीनाथ मुंडे आदींच्या सभांनी आणखी गदारोळ निर्माण होणार आहे.
स्थानिक आमदार नगरमध्येच
उद्या, सोमवारपासून विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होत असले तरी आ. अनिल राठोड, आ. अरुण जगताप, माजी मंत्री आ. बबनराव पाचपुते, आ. डॉ. सुधीर तांबे, काँग्रेसचे प्रभारी आ. शरद रणपिसे आदी लोकप्रतिनिधी शहरातच थांबणार असल्याचे समजले. मनसे वगळता अद्याप एकाही पक्षाने निवडणुकीच्या निमित्ताने शहर विकासासाठी काय करणार याची माहिती देणारे जाहीरनामे, वचननामे प्रसिद्ध केले नाहीत. गेल्या निवडणुकीतील आश्वासनांची किती पूर्तता झाली, याची माहितीही यंदाच्या जाहीरनाम्यातून द्यावी, अशीही मतदारांची मागणी आहे.
सुटीमुळे दिवसभर प्रचाराची रणधुमाळी
रविवारच्या सुटीची संधी साधत महापालिका निवडणुकीतील सर्वच पक्षांच्या उमेदवारांसह अपक्षांनीही शहरात आज जोरदार प्रचारफेऱ्या, पदयात्रा काढून रणधुमाळी निर्माण केली.
First published on: 09-12-2013 at 01:53 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election promotion of all day due to holiday