नेमक्या मतदानाच्या पूर्वसंध्येलाच शहरात थंडीने पारा नीचांक खाली आला, त्याचा परिणाम रविवारी सकाळी मतदानाच्या वेळी जाणवला. कडाक्याच्या गारठय़ातच सकाळी ७.३० वाजता मतदानाला प्रारंभ झाला. अपवाद वगळता सकाळी शहराच्या मध्य भागातील बहुसंख्य मतदान केंद्र ओस पडली होती. थंडीचा हा परिणाम होता. सकाळी १० नंतर म्हणजे अडीच तासाने मतदार बाहेर पडू लागले. त्यानंतर मात्र मतदान केंद्रांवर वर्दळ वाढली आणि ११ नंतर रांगा सुरू झाल्या. उन्हामुळे थंडीची तीव्रता कमी झाली, तस-तशा मतदान केंद्रावरील रांगाही लांबल्या. बहुसंख्य केंद्रांवर नंतर मतदान संपेपर्यत हा वेग कायम होता. झेंडीगेट भागात मात्र सुरूवातीपासूनच मतदानाचा वेग मोठा होता. येथे सकाळी थंडीचाही फारसा परिणाम जाणवला नाही.
इलेक्ट्रॉनिक यंत्रांवर मतदान सुरू झाले, त्यानंतर प्रथमच या प्रक्रियेत कमालीचा सफाईदारपणा जाणवला. पुरेशा व्यवस्थेमुळे मागच्या काही निवडणुकांमध्ये यावेळीच हा अनुभव आला. यंत्रणेतील या सफाईदारपणामुळेच मतदानाला लागणारा वेळ खूपच कमी झाला. ही गोष्ट मतदारांच्या दृष्टीने दिलासादायक ठरली.
कडक आणि चोख पोलीस बंदोबस्त हे मनपाच्या या निवडणुकीचे वैशिष्ठय़ ठरावे. मतदानाच्या पूर्वसंध्येला म्हणजे शनिवारी सायंकाळनंतरच पोलिसांनी कडक बंदोबस्ताची चुणूक दाखवून दिली. शनिवारीच सायंकाळनंतर शहर व उपनगरांमध्येही पोलिसांची मोठी गस्त सुरू झाली. संवेदनशील प्रभागांमध्ये त्याची प्रचिती अधिक प्रभावीपणे आली. कापड बाजारातील रात्रीची चौपाटीही पोलिसांनी रात्री साडेदहालाच बंद केली. त्यानंतर गस्त अधिक बंदोबस्त अधिक कडत करत तासाभरात रस्तेही निर्मनुष्य करण्यात आले. रविवारी मतदान केंद्रांवरही मोठा बंदोबस्त होता. केंद्रापासून शंभर मीटर सरहद्दीची मर्यादाही यावेळी अधिक काटेकोरपणे पाळण्यात आली. या मर्यादेच्या आत उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनाही प्रवेश नव्हता. या सीमारेषेबाहेरील गर्दीही सातत्याने पांगवण्यात येत होती.
प्रभाग २१ मध्ये मोठी गर्दी
आमदार अनिल राठोड बराच काळ प्रभाग २१ मध्ये ठाण मांडून होते. येथे त्यांचे चिरंजीव विक्रम हेच उमेदवार असल्याने शिवसैनिकांचीही दिवसभर येथे मोठी गर्दी होती. लक्ष्मी कारंजा येथील मरकडेय शाळेतील केंद्राजवळ सकाळी ११ च्या सुमारास राठोड येथे आल्यानंतर येथील मनसेचे उमेदवार किशोर डागवाले व त्यांच्यामध्ये शाब्दिक चकमकही उडाली. त्यामुळे काही वेळ येथे तणाव निर्माण झाला होता.
मतदारांची वाहतूक
मतदान केंद्रांवर मोठा बंदोबस्त होता तरी, वाहनांमधून होणारी मतदारांची वाहतूक मात्र खुले आम सुरू होती. आधी जाहीर करूनही पोलिसांना त्यावर नियंत्रण ठेवता आले नाही. बहुसंख्य केंद्रांवर त्याची प्रचिती आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा