जिल्हय़ातील ७०५ ग्रामपंचायतींचे निवडणूक मतदान रविवारी (दि. २६) होणार आहे. जवळपास १० हजार उमेदवार निवडणूक रिंगणात असून, १०० ग्रामपंचायती बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत.
राज्य व जिल्हास्तरावर काम करणाऱ्या विविध पक्ष-संघटनांच्या पुढाऱ्यांची स्वत:च्या गावात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अनेकांनी निवडणूक बिनविरोध करून वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न केला असला, तरी गावकीच्या वादामुळे ते शक्य झाले नाही. जिल्हय़ाचे लक्ष वेधलेल्या नाथ्रा गावात भाजपच्या मुंडे कुटुंबातील फाटाफुटीमुळे दोन आघाडय़ांत रंगतदार सामना होत आहे. पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर, आमदार सुरेश धस, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक डक यांनी गावात निवडणूक बिनविरोध करून थोडेबहुत यश मिळवले असले, तरी बहुतांश ठिकाणी पुढाऱ्यांना स्थानिक पातळीवर गटांमुळे आपले वर्चस्व दाखवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी लागत आहे.
दरम्यान, बिनविरोध निवडलेल्या ग्रामपंचायती आपल्याच गटाच्या, असा दावा अनेकांनी केला. प्रत्यक्षात गावकीमुळे बिनविरोध निवडणुकीचे वारे पुढाऱ्यांच्या गावात पोहोचले नाही. जिल्हय़ात सर्वाधिक लक्षवेधी ठरलेल्या परळी तालुक्यातील नाथ्रा गावची निवडणूक या वेळी मुंडे कुटुंबातील फाटाफुटीमुळे चर्चेत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांचे जन्मगाव असलेल्या या गावची निवडणूक वर्षांनुवर्षे एकहाती होत असे. या वेळी मात्र परळी तालुक्यात सर्वच ठिकाणी भाजप बंडखोर आमदार धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसमोर भाजपच्या विरोधात पॅनेल मैदानात उतरवले आहेत. आष्टीचे आमदार सुरेश धस यांच्या जामगाव येथे मात्र ग्रामपंचायत बिनविरोध झाली. पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या नवगण राजुरीमध्ये त्यांचे बंधू रवींद्र क्षीरसगार यांच्या प्रयत्नातून ग्रामपंचायत पुन्हा बिनविरोध झाली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक डक यांची माजलगाव तालुक्यातील सोनथडी ग्रामपंचायत व भाजपचे गटनेते जिल्हा परिषद सदस्य मदनराव चव्हाण यांना बीड तालुक्यातील नाथापूर ही मोठी ग्रामपंचायत बिनविरोध राखण्यात यश आले.
मानवी हक्क अभियानच्या माध्यमातून राज्यभर चळवळ उभी करणाऱ्या अॅड. एकनाथ आवाड यांच्या दुकडेगाव येथे सलग पाचव्यांदा ग्रामपंचायत बिनविरोध झाली. माजलगाव कारखान्याचे उपाध्यक्ष किसनराव नाईकनवरे यांची रेणापूर ग्रामपंचायत पुन्हा बिनविरोध झाली. ग्रामपंचायत स्थापनेपासून येथे एकदाही निवडणूक झाली नाही. हे काही ठराविक अपवाद वगळता जिल्हय़ातील इतर गावांत कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायती बिनविरोध केल्या असल्या, तरी पुढाऱ्यांच्या गावात मात्र चुरस पाहावयास मिळत आहे. आमदार विनायक मेटे यांच्या राजेगावमध्ये केवळ एक जागा बिनविरोध झाली. कमी-अधिक  फरकाने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना व भाजपच्या तालुका-जिल्हास्तरीय पुढाऱ्यांना आपल्या स्वत:च्या ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात फारसे यश आले नाही. मात्र, गावकीच्या वादात चालत नसले तरी यातील अनेकांनी आपापल्या परिसरातील ग्रामपंचायती बिनविरोध काढून आपले वर्चस्व राखण्यात प्रयत्न केला.