गावात तंटे निर्माण होण्यास काही अंशी राजकीय हस्तक्षेपही कारणीभूत ठरतो. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असो वा कुठल्याही सहकारी संस्थेची. त्यावेळी या वादास अधिकच खतपाणी घातले जाते. गावात तंटे होऊ न देता राजकीय सामंजस्याद्वारे शांततेचे वातावरणात निर्माण करून विविध कार्यकारी सोसायटी, ग्रामपंचायत व पतपेढय़ांची निवडणूक प्रक्रिया अविरोध पार पाडणे आवश्यक ठरते. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत त्याचाही प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे.
गाव पातळीवर वाद निर्माण होण्याची जी काही कारणे आहेत, त्यातील महत्वाचे कारण म्हणजे राजकीय मतभेद. कधीकधी छोटय़ा कारणावरून सुरू झालेला राजकीय वाद पुढे मोठे स्वरूप धारण करतो. गटातटातील राजकारणामुळे त्यास हिंसक वळणही लागते. त्यामुळे गावातील शांतता व सुव्यवस्था धोक्यात येते. या वादाशी कोणताही संबंध नसलेला ग्रामस्थ हा घटक त्यात नाहक भरडला जातो. ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सोसायटी व पतपेढी यांच्या निवडणुकीत विविध राजकीय पक्षांचे स्थानिक पदाधिकारी एकमेकांसमोर शड्डू ठोकून उभे राहतात. प्रचारादरम्यान त्यांचे वादंग उडतात. त्याचा परिणाम शांततेवर होत असल्याने किमान गाव पातळीवर या घटकांनी सामंजस्य राखून काम करावे, असा दृष्टीकोन ठेवण्यात आला आहे. गावात ज्यांच्या शब्दाला मान आहे अथवा ज्यांचा शब्द प्रमाण मानला जातो, त्यांना प्रामुख्याने तंटामुक्त गाव समितीमध्ये स्थान दिले जाते. त्यांच्यामार्फत गावातील राजकीय मतभेद व कटुता दूर करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जावेत, याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये गावात राजकीय सामंजस्य निर्माण करण्याचा अंतर्भाव करण्यात आला आहे.
त्या अंतर्गत गावातील विविध कार्यकारी सोसायटी, ग्रामपंचायत, पतपेढी वा तत्सम निवडणूक अविरोध होण्यासाठी प्रयत्न करणे आणि प्रयत्न करूनही निवडणूक अविरोध होऊ शकली नाही तर ती शांततेत पार पडावी, असे अभिप्रेत आहे. जेणेकरून राजकीय मतभेदापायी ग्रामस्थांमध्ये गटा-तटाच्या राजकारणाला थारा राहणार नाही आणि वादही आपसूक टाळले जातील. तंटामुक्त गाव समितीच्या सदस्यांनी केलेल्या प्रयत्नांची फलनिष्पत्ती अनेक ठिकाणी निवडणूक अविरोध पार पडण्यात झाली. उत्तर महाराष्ट्रात काही गावांमध्ये या पद्धतीने अविरोध ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्याच्या या प्रक्रियेत तंटामुक्त गाव समितीची भूमिका महत्वपूर्ण ठरते.
ग्रामीण भागात शांततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान राबविले जात आहे. या मोहिमेचे यंदा सातवे वर्ष. या माध्यमातून स्थानिक पातळीवरील तंटे सामोपचाराने मिटविणे आणि विविध स्वरूपाचे उपक्रम राबवून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न होत आहे. या मोहिमेच्या नाशिक विभागातील कामगिरीचा वेध मालिकेद्वारे घेण्यात येत आहे. मालिकेतील एकोणत्तीसावा लेख.

Story img Loader