ठाणे महापालिकेतील महापौर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या पराभवात मोलाची कामगिरी बजावीत शिवसेनेला मदतीचा हात देणारे काँग्रेसचे मुंब्रा परिसरातील बंडखोर नेते राजन किणे यांना येत्या १५ दिवसांत होणाऱ्या महापालिका पोटनिवडणुकीत काँग्रेसने पुन्हा उमेदवारी देऊन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जितेंद्र आव्हाड यांना धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे.  कळवा-मुंब्रा परिसर कल्याण लोकसभा मतदारसंघात मोडत असल्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर मुंब््रयात दोन्ही काँग्रेसमध्ये रंगणारा हा सामना आनंद परांजपे यांच्यासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महापौर निवडणुकीत गैरहजर राहत शिवसेनेच्या विजयात हातभार लावल्याबद्दल पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत कोकण आयुक्तांनी राजन किणे यांच्यासह काँग्रेसच्या तीन नगरसेवकांची पदे रद्द केली होती.
राजन यांनी उघड बंडखोरी केल्याने जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर समर्थक नजीब मुल्ला यांच्या हातातोंडाशी आलेला महापौरपदाचा घास शिवसेनेने हिरावून घेतला होता. त्याच किणे यांना पुन्हा उमेदवारी देऊन काँग्रेसने आव्हाडांना कात्रजचा घाट दाखविला असून या घडामोडीचे पडसाद ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील आघाडीच्या समीकरणावर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या दोन्ही मतदारसंघांत दोन्ही काँग्रेसमधील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर विसंवाद असल्याचे चित्र असून ठाण्यात झालेल्या एका बैठकीत काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रवादीला निवडणुकीत जागा दाखवू, असा इशारा दिल्याने आघाडीत खळबळ उडाली आहे. या पाश्र्वभूमीवर मुंब्रा येथील पोटनिवडणुकीत आव्हाडांचे कट्टर विरोधक राजन किणे यांना पुन्हा उमेदवारी देऊन काँग्रेसने राष्ट्रवादीची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.
मुंब्र्यात दोन्ही काँग्रेस आमने-सामने
दोन वर्षांपूर्वी झालेल्या महापौर निवडणुकीत काँग्रेसचे मुंब्रा परिसरातील नगरसेवक राजन किणे त्यांच्या पत्नी नगरसेविका अनिता किणे आणि शकिला कुरेशी असे तिघे नगरसेवक मतदानाच्या एक दिवस आधीपासून बेपत्ता झाल्याने राष्ट्रवादीची गणिते चुकली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सात नगरसेवकांनी पाठिंबा दिल्याने ठाण्यात शिवसेनेचा महापौर झाला, असे चित्र वरवर रंगविले गेले असले तरी मनसेच्या पाठिंब्याला काँग्रेस नगरसेवकांच्या फुटीची पाश्र्वभूमी होती. काँग्रेसचे तीन नगरसेवक आदल्या दिवशी आघाडीच्या गोटातून निसटल्याने राष्ट्रवादीला पाठिंबा देऊनही बहुमताचे गणित जमणार नाही, हे राज ठाकरे यांच्या लक्षात आले होते.
दरम्यान, राजन किणे यांच्यासह मुंब््रयातील तिघा नगरसेवकांनी पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल काँग्रेसने यासंबंधीची याचिका कोकण आयुक्तांकडे दाखल केली होती. गेल्या विधानसभा निवडणुकीत कळवा-मुंब्रा मतदारसंघात जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात शिवसेनेकडून राजन किणे लढले होते. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यानंतर पुढे ते काँग्रेस पक्षात गेले आणि तेथे नगरसेवक झाले. त्यामुळे काँग्रेसच्या नथीतून तीर मारत आव्हाडांनी किणे यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. दरम्यान, लोकसभा निवडणुकांच्या आधी मार्च महिन्यात मुंब््रयातील तीन मतदारसंघांत पोटनिवडणूक होत असून त्यापैकी एका प्रभागातून काँग्रेसने पुन्हा राजन किणे यांना उमेदवारी देत आव्हाडांना धक्का दिला आहे.
या प्रभागात राजन किणे यांच्यासह रेश्मा रमेश पाटील आणि असीमा यासीन कुरेशी यांना काँग्रेसने उमेदवारी दिली असून हे तिघेही आव्हाडांचे कट्टर विरोधक मानले जातात. किणे पुन्हा रिंगणात उतरल्याने आव्हाडांनी त्यांच्याविरोधात महेंद्र कोमुर्लेकर यांना उमेदवारी दिली असून यामुळे मुंब््रयात काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे.

Story img Loader