कोणी पेन देता का?.. भाऊ आधी मतदार यादीत नाव होतं, फोटो पण होता, पण मागच्या खेपेला माझे नावच गायब झाले यादीतून, काय करता येईल, या रकान्यात नेमके काय लिहायचे.. साहेब आहेत का? जरा काम होते.. या अशा एक ना अनेक प्रश्नांचा भडिमार बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील मतदार नोंदणी विभागात सुरू होता. आगामी विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी बुधवार ही अंतिम मुदत दिल्याने नागरीकांनी यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी एकच गर्दी केली. नांव नोंदणीसाठी रांगा लागल्या असताना कामाच्या वेळी नोंदणी कक्षातील सव्र्हर डाऊन झाल्यामुळे कामकाजाचा बोजबारा उडाला.
येत्या १५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी १७ सप्टेंबर अंतिम मुदत देण्यात आली होती. यानुसार यादीत नव्याने नवमतदारांचे नाव समाविष्ट करणे, नावात किंवा पत्यात काही बदल असल्यास, यादीत छायाचित्र नसल्यास, यादीत नाव नसल्यास आदी प्रश्नांबाबत निवडणूक आयोगाकडून विशेष मोहीम ८ ते १७ सप्टेंबर कालावधीत राबविली गेली. अंतिम दिवस असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील नोंदणी कक्षातील कर्मचारी नोंदणीसाठी आलेल्या मतदारांच्या प्रश्नांनी काहीसे त्रस्त झाले. नव मतदार नोंदणी, पत्त्यात बदल अथवा इतर काही कारणास्तव नाव वगळल्या गेलेल्यांमध्ये अर्ज नेमके कुठले भरायचे यावरून बराच गोंधळ झाला.
अर्ज क्रमांक ६ नवमतदारांसाठी असला तरी अनेकांनी यादीत नाव नाही म्हणून तोच अर्ज नव्याने भरत आन्हिक उरकले. काहींना नेमका कोणता अर्ज भरायचा आहे याची माहिती असली तरी ऐनवेळी हा अर्ज कोणत्या खिडकीवर मिळेल, आपला परिसर माहीत असला तरी विधानसभानिहाय कुठल्या मतदार संघात येईल याची खातरजमा करण्यात अनेकांची कर्मचाऱ्यांशी शाब्दिक चकमकी उडाल्या. अर्ज सादर करताना वयोवृध्दांना प्राधान्य देण्यात असले तरी अर्ज दुसरे कोणी भरून देईल का यासाठी त्यांना तिष्ठत रहावे लागले. काही महिला आपल्या बाळासह उन्हाच्या झळा घेत रांगेत उभ्या होत्या. या गदारोळात नवमतदारांचा उत्साह तसुभर कमी झाला नाही. ऐनवेळी कागदपत्र जमविण्यासाठी झालेल्या धावपळीत काही स्वयंसेवक अडलेल्यांचे अर्ज भरून देणे, शंकाचे समाधान करणे अशी कामे करत होते.
मतदार नोंदणी कार्यालयाबाहेर असा गोंधळ सुरू असतांना कार्यालयात फारशी वेगळी परिस्थिती नव्हती. मतदार संघातील मतदारांची नोंदणी करत, कागदपत्रांची पडताळणीचे काम सकाळपासून ‘ऑनलाईन’ सुरू होते. मात्र दुपारनंतर कार्यालयातील बहुतांश संगणकांवर ‘सव्र्हर डाऊन’चा संदेश झळकला. यामुळे सर्व कामे ठप्प झाली. येणाऱ्या नागरीकांच्या शंकाचे समाधानही करणे अवघड झाले. यामुळे वाद झाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा