शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी स्टेडियमचा पूर्णत: कायापालट करण्यासाठी जिल्हा क्रीडा संकुल समिती व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय प्रयत्नशील असताना त्यांच्या या प्रयत्नात वेगवेगळ्या प्रकारचे अडथळे येत आहेत. जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या जिल्हा क्रीडा संकुल समितीने अलिकडेच खेळाडुंच्या सुरक्षिततेसंदर्भात पाठविलेल्या पत्राची कोणतीही दखल घेण्यात स्वारस्य न दाखवून विद्युत कंपनीने आपण जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राला किती किंमत देतो हेच एकप्रकारे दाखवून दिले आहे.
एरवी विविध खेळांच्या स्पर्धामुळे चर्चेत असणाऱ्या छत्रपती शिवाजी स्टेडियमवर पुन्हा एकदा जिल्हा परिषदेने हक्क सांगितल्याने वाद निर्माण झाला आहे. या वादातून कोणता तोडगा निघेल ते अद्याप अधांतरी असताना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या अथक प्रयत्नांनी स्टेडियमने जणूकाही कात टाकली आहे. स्टेडियमचे नवीन रंगरूप खेळाडुंसह इतर क्रीडाप्रेमींना खुणावत असताना त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारीही आपसूक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा संकुल समितीवर येऊन पडते. त्यादृष्टिने त्यांनी लक्ष देण्यास सुरूवात केली असून हुतात्मा स्मारकजवळच प्रवेशव्दार बसविण्यात आले असून तेथे पहारेकरीही ठेवण्यात येऊ लागला आहे. त्यामुळे इतर अवैध कामांसाठी स्टेडियममध्ये शिरकाव करणाऱ्यांवर प्रतिबंध आला. परिणामी स्टेडियमची निगा राखण्यास मदत होऊ लागली. महात्मा गांधी रस्त्याच्या बाजुकडील स्टेडियमचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले. अशा प्रकारे क्रीडाप्रेमींच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न करण्यात येत असताना शासकीय कन्या विद्यालयालगत स्टेडियमच्या कोपऱ्यात असलेले रोहित्र आणि ‘जंक्शन बॉक्स’मुळे क्रीडाप्रेमींच्या सुरक्षिततेचा प्रश्न कायम असल्याची जाणीव क्रीडा कार्यालय आणि संकुल समितीला झाल्यानंतर त्यांनी हा प्रश्न धसास लावण्याचा निर्णय घेतला.
स्टेडियममधील ४०० मीटरच्या धावन मार्गालगतच हे रोहित्र असल्याने आणि काही विद्युत केबल उघडय़ाच असल्याने एखादा बाका प्रसंग कोणत्याही क्षणी उद्भवू शकतो. स्टेडियममधील धावन मार्ग शहरातील इतर कोणत्याही ठिकाणच्या धावन मार्गापेक्षा उत्कृष्ठ झाल्याने सध्या अनेक जण त्याचा वापर करीत आहेत. त्यात लहान मुलांचाही समावेश असल्याने कोणताही धोका न पत्करता जिल्हा क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष विलास पाटील यांनी आठ मार्च रोजी विद्युत कंपनीच्या कार्यकारी अधीक्षकांना पत्र पाठवून रोहित्र हलविण्याची मागणी केली.
विशेष म्हणजे रोहित्रासाठी जवळच पर्यायी जागाही आहे. खेळाडुंच्या सुरक्षिततेचा मुद्दा आणि खुद्द जिल्हाधिकाऱ्यांची मागणी असल्याने त्याची त्वरीत दखल घेणे अपेक्षित होते. परंतु विद्युत कंपनीने अद्यापही त्या पत्राची कोणतीही दखल घेतलेली नाही. विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्यानंतर स्टेडियममध्ये येणाऱ्यांमध्ये वाढ होणे निश्चित असून त्याआधी विद्युत कंपनीने हे रोहित्र आणि जंक्शन बॉक्स हलविण्याची मागणी जिल्हा क्रीडा अधिकारी सुधीर मोरे यांनी केली आहे.              

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा