महावितरणच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी व्यवस्थापनाने गट विमा योजनेतंर्गत अपघात विमा योजना लागू केली आहे. ही योजना युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीतर्फे राबविण्यात येणार असून विम्याचा हफ्ता महावितरणतर्फे भरण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या विमा पॉलिसीची रक्कम प्रत्येकी २ लाख रुपये इतकी राहणार आहे.
महावितरणच्यावतीने कर्मचाऱ्यांसाठी यापूर्वी अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या
 आहेत. तांत्रिक कर्मचारी आपली जीव धोक्यात घालून जिवंत वाहिन्यावर सतत काम करीत असतात. अशा वेळी सर्व खबरदारी घेऊनही काही कर्मचारी प्राणघातक अपघातास बळी पडतात. अथवा त्यांना अंपगत्व येते.
अशा कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू केली आहे. या योजनेतंर्गत कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास अथवा त्याला कायमचे अपंगत्व आले तर १०० टक्के नुकसान भरपाई दिली जाणार
आहे. तसेच अंशत: अपंगत्व आल्यास अपंगत्वाच्या प्रमाणपत्रानुसार नुकसान भरपाई दिली जाईल. नुकसान भरपाई कायद्यांतर्गत मिळणाऱ्या भरपाई व्यतिरिक्त ही रक्कम दिली जाणार असल्याचे महावितरणने कळविले आहे.