उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. गोंदिया जिल्ह्य़ात तापमानाने चाळिशी ओलांडली आहे. राज्य शासनानेही यावर्षी भारनियमन करण्यात येणार नसल्याचे सांगितले, मात्र दुरुस्तीच्या नावावर भारनियमन करून नागरिकांना त्रास देण्याचा सपाटा महावितरणने सुरू केला आहे. गुरुवारला रात्री एक-दोन नव्हे तब्बल ६ वेळा शहराचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे नागरिकांना अख्खी रात्र उकाडा आणि डासांच्या सान्निध्यात काढावी लागली.
तिरोडा येथे तयार झालेल्या अदानी पॉवर महाराष्ट्र लिमिटेडचे दोन संच सुरू झाले आहे. उर्वरित तीन संचाचे कामदेखील युद्धपातळीवर सुरू आहे. हे प्रकल्प सुरू झाल्यानंतर जिल्हावासींची भारनियमनापासून कायमची मुक्तता होईल, असे वाटू लागले होते, मात्र हा प्रकल्प दिवास्वप्न ठरू पाहत आहे. या प्रकल्पातून निर्मित होणारी वीज महाराष्ट्र शासनाचे महावितरण खरेदी करून ती नंतर कुठे आणि किती दराने विक्री करायचे हे महावितरण कंपनी ठरविणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा लाभ जवळील ५ किलोमीटर परिसर सोडून जिल्ह्य़ातील इतरांना मिळणार नसल्याचे दिसून येत आहे. नक्षलवादग्रस्त भागात भारनियमन करण्यात येऊ नये, असा शासनाचा नियम आहे. त्यामुळे गोंदिया जिल्हा नक्षलवादग्रस्त आणि आदिवासीबहुल डोंगराळ प्रदेशात असल्यामुळे हा जिल्हा भारनियमनमुक्त करणे गरजेचे आहे, परंतु या जिल्ह्य़ातील नागरिकांना भारनियमनाचा सातत्याने सामना करावा लागत आहे. महावितरणचे अधिकारी देखील प्रकरण आपल्या अंगावर येऊ नये म्हणून भारनियमन करण्यामागचे कारण येथे होणारी विद्युत चोरी असल्याचे सांगत आहेत; परंतु महावितरणाकडे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा असताना वीजचोरीवर आळा घालण्यात का येत नाही, हा प्रश्नच आहे. दुसरीकडे भारनियमन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशांचे पालन करणे गरजेचे असल्यामुळे येथील महावितरणचे अधिकारी वारंवार दुरुस्तीच्या नावावर भारनियमन करतात. जिल्ह्य़ात तापमानाचा पारा ४० अंशाच्या वर गेला आहे. पंखे आणि कुलरशिवाय घरात राहता येत नाही. अशा स्थितीत दिवसा सोडून रात्रीचे भारनियमन करण्यात येते. गुरुवारी रात्री साडे दहाच्या सुमारास विद्युत पुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे संपूर्ण शहर अंधारात सापडले. तासभराने विद्युत पुरवठा सुरळीत झाला, मात्र त्यानंतर पुन्हा पुरवठा खंडित झाला. हा प्रकार पहाटेपर्यंत सुरूच होता. दर अध्र्या तासाने विद्युत पुरवठा खंडित करण्यात येत असल्याने शहरवासीयांना मोठा त्रास सहन करावा लागला. या प्रकाराबद्दल विचारणा केली असता टॉन्सफार्मर दुरुस्तीचे नाव देऊन अधिकारी मोकळे झाले.
महावितरणचे कार्यकारी अभियंता फुलकर यांना विचारणा केली असता तिरोडा मार्गावर वाहनाने धडक दिल्याने विद्युत पुरवठा करणारी लाईन तुटली. त्यामुळे शहरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. रात्री दरम्यान शहर अंधारात सापडू नये, याकरिता विभागाने मोठी कसरत केली. इतर फिडरशी शहराला जोडून शहरात विजेची सोय करण्यात आली. हा भारनियमनाचा प्रकार नव्हता, असे सांगितले.