* मुंबई उपनगरात बडय़ा ग्राहकांसाठी ‘टाटा’पेक्षा ‘रिलायन्स’ची वीज स्वस्त
* दरमहा सहा ते ८० टक्क्यांची बचत
* मध्यमवर्गीय घरगुती ग्राहकांसाठी ‘टाटा’चे बेस्ट
मुंबई उपनगरातील वीजव्यवसायावरून ‘रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर’ आणि ‘टाटा पॉवर कंपनी’ यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू असली तरी ग्राहकांचा मात्र त्यात लाभ होत आहे. घरगुती ग्राहकांसाठी ‘टाटा’ची वीज स्वस्त ठरली असताना नव्या दररचनेत व्यापारी, औद्योगिक आणि गृहनिर्माण संकुलांसारख्या बडय़ा ग्राहकांसाठी मात्र ‘रिलायन्स’ची वीज स्वस्त पडणार आहे. वेगवेगळय़ा ग्राहक गटांनुसार दर महिन्याच्या वीजदेयकात सहा टक्क्यांपासून ८० टक्क्यांची बचत होणार आहे. त्यामुळे दोन वीज कंपन्यांच्या भांडणात मधल्या मध्ये ग्राहकांचा लाभ होत आहे.
मुंबई उपनगरात वीजग्राहकांना ‘रिलायन्स’ आणि ‘टाटा’ असे दोन पर्याय वीजसेवेसाठी आहेत. या स्पर्धेत आधी ‘टाटा’ची वीज सर्व गटांसाठी स्वस्त असल्याने ‘रिलायन्स’ला सोडचिठ्ठी देत लाखो ग्राहकांनी ‘टाटा’ची सेवा घेतली. आता नव्या दररचनेत मध्यमवर्गीय घरगुती ग्राहकांसाठी ‘टाटा’ची वीजच स्वस्त ठरली आहे. दरमहा चांगली बचत होणार असल्याने आगामी काळात ‘रिलायन्स’कडील २३ लाख घरगुती ग्राहकांपैकी अनेक ग्राहक ‘टाटा’कडे जाण्याची शक्यता आहे.
त्याचवेळी या नव्या दरपत्रकात वीज आयोगाच्या आदेशामुळे व्यापारी ग्राहक, गृहनिर्माण संकुले, औद्योगिक ग्राहक, जाहिरात-होर्डिग्ज या बडय़ा आणि घसघशीत महसूल देणाऱ्या ग्राहकांसाठी मात्र ‘रिलायन्स’ची वीज अधिक फायद्याची ठरणार आहे. दरमहा एक लाख युनिट वीज वापरणाऱ्या उच्च दाब औद्योगिक ग्राहकांनी ‘रिलायन्स’ची वीज घेतल्यास ‘टाटा’च्या तुलनेत त्यांना दरमहा दीड लाख रुपयांची बचत होईल. तर इतकाच वीज वापर असलेल्या व्यापारी गटातील ग्राहकांसाठी ‘रिलायन्स’ची वीज दरमहा तब्बल एक लाख ९९ हजार रुपयांनी स्वस्त ठरेल. दरमहा ५० हजार युनिट वीजवापर असलेल्या गृहनिर्माण संकुलांना ‘टाटा’पेक्षा ‘रिलायन्स’ची वीज दरमहा २१ हजार रुपयांनी स्वस्त ठरेल. तर जाहिरातदारांसाठी ‘रिलायन्स’ची वीज ‘टाटा’पेक्षा तब्बल ८० टक्क्यांनी स्वस्त असून महिन्याला त्यांचा १५ रुपयांचा लाभ होईल.
खुद्द वीज आयोगाने आपल्या पत्रकात या बडय़ा ग्राहकांसाठी आता ‘रिलायन्स’ची वीज अधिक स्वस्त ठरेल, असे नमूद केले होते.
त्यामुळे उपनगरात मध्यमवर्गीय घरगुती ग्राहकांसाठी ‘टाटा पॉवर’ तर बडय़ा वीजग्राहकांसाठी ‘रिलायन्स’ची वीज स्वस्त ठरणार आहे. परिणामी येत्या काळात उपनगरातील बडय़ा वीजग्राहकांचा ओघ पुन्हा एकदा ‘रिलायन्स’कडे वळण्याची चिन्हे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा