ऐन नवरात्रोत्सवात दररोज रात्रीच्या वेळी महावितरणने भारनियमनाचा खाक्या सुरूच ठेवल्याच्या निषेधार्थ सोमवारी येथील विविध भागांत नवरात्रोत्सव साजरा करणाऱ्या दुर्गानी एफसीआय रस्त्यावरील वीज कंपनीच्या रोडवरील कार्यालयावर घोषणा देत मोर्चा काढला. सुमारे दोन तास येथे वीज कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेराव घालून ठिय्या दिला. किमान नवरात्रोत्सवात शहरात रात्रीचे भारनियमन होणार नाही, असे आश्वासन वीज कंपनीने दिल्याचे आंदोलक महिलांनी म्हटले आहे.
रविवारी रात्री नवरात्रोत्सवात लागोपाठ तिसऱ्या दिवशीही भारनियमनाने वीजपुरवठा सुमारे दोन तास खंडित झाल्यानंतर रात्री गांधी चौकातील महिलांनी थेट महावितरण कार्यालयावर मोर्चा नेला; परंतु त्या वेळी कोणीही जबाबदार अधिकारी आढळले नाही. त्यानंतर सोमवारी सकाळी भारनियमन सुरूच राहिल्याने पुन्हा सर्व भागांतील महिला एकत्र आल्या आणि त्यांनी सकाळी ११ वाजता गांधी चौकातून घोषणा देत थेट महावितरण कार्यालयावर धडक दिली. संतप्त महिलांच्या रुद्रावतारामुळे उपस्थित अधिकाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. त्यांनी पोलिसांना पाचारण केले. यामुळे महिला अधिकच संतापल्या. वीज कंपनीचे साहाय्यक अभियंता पी. के. वनमोरे, उपअभियंता अमोल मेहेर, उपअभियंता पी. के. निरगुडे यांच्यावर महिलांनी प्रश्नांची सरबत्ती करीत धारेवर धरले. उत्सवकाळात जबाबदार अधिकारी कार्यालयात उपस्थित नसतात. रात्रीचे भारनियमन केले जाते. रात्रीच्या अंधारात महिला मंडळांमध्ये टिपरी नृत्य सुरू अताना गैरप्रकार घडल्यास त्यास जबाबदार कोण घेणार, असा सवाल संतप्त महिलांनी उपस्थित केला. ठिकठिकाणी महिलांनी मंडळात देवीच्या मूर्ती बसविल्या आहेत. भारनियमनामुळे मंडपातील मूर्तीची सुरक्षितता धोक्यात आली आहे, ही बाबही त्यांनी निदर्शनास आणून दिली. किमान दसऱ्यापर्यंत रात्रीचे भारनियमन करू नये, अशी मागणी करत महिलांनी कार्यालयासमोर ठिय्या दिला. माजी नगराध्यक्ष रहेमान शाह, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ पारीख, सोनाली गवळी, ज्योती गवळी, सुजाता आवटे आदींच्या नेतृत्वाखाली सुमारे दोन तास ही निदर्शने सुरू होती.
भारनियमनाने रात्रीच्या दांडिया खेळाला अडथळा निर्माण होत आहे, अशी बाजू महिलांनी मांडली.येथे नव्याने रुजू झालेल्या नवीन महिला उपअभियंता निरगुडे या आंदोलन सुरू असताना दोन तास कार्यालयात आल्या नाहीत. त्यामुळे महिलांच्या संतापाचा पारा अधिकच चढला. दुपारच्या सुमारास निरगुडे यांचे आगमन झाल्यावर महिला आंदोलकांनी निषेधाच्या घोषणा देत त्यांचे स्वागत केले. सोमवारपासून शहरात रात्रीचे भारनियमन केले जाणार नाही, वीजपुरवठा खंडित होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ, असे आश्वासन वीज कंपनीने दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा