जलसंपदा विभागात ज्या पद्धतीने निविदा देण्याचा उद्योग केला गेला, तशीच पद्धत अवलंबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढील पाच वर्षांत वीज क्षेत्रातील कंत्राटे ठरविली असल्याचा घणाघाती आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी गुरुवारी केला. या विभागातील गरप्रकारांचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
येत्या काही दिवसांत आणखी वीज दरवाढ होणार असून तसा प्रस्ताव आणला जात आहे. सध्या राज्यातील वीज सर्वात महाग आहे. उद्योगांना ९ रुपये प्रतियुनिट दर आकारला जात आहे. घरगुती वीज देयकात वाढ झाली आहे. शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे. १५ जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांना हप्ते करून द्यावेत, अशी मागणी करतानाच मुंडे यांनी उपमुख्यमंत्री पवार यांनी ऊर्जा खात्यातील निविदांमध्ये घोळ असल्याचे सांगितले. पुढील ५ वर्षांच्या कामांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. येत्या हिवाळी अधिवेशात वीजप्रश्नी भाजप राज्य सरकारला धारेवर धरेल, असे मुंडे म्हणाले.
महायुतीच्या जागावाटपाच्या अनुषंगाने येत्या आठवडय़ात निर्णय होणार आहे. लोकसभेच्या ३०पेक्षा अधिक जागा निवडून याव्यात,  या साठी प्रयत्न करणार असल्याचे मुंडे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. रिपब्लिकन पक्षाला लोकसभा निवडणुकीत योग्य जागा दिल्या जातील, असेही ते म्हणाले. विधान परिषदेच्या सहाव्या जागेसाठी रामदास आठवले यांचा जोर वाढत असल्याबाबत त्यांना विचारले असता मुंडे म्हणाले की, उद्धव ठाकरे, आठवले यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेऊ. राज्य व केंद्रातील सरकारवर आरोपपत्र दाखल करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली आहे. त्यानुसार डिसेंबरअखेर हे आरोपपत्र तयार होईल. पदवीधर मतदारसंघातील उमेदवार अजून ठरला नाही, तो १५ दिवसांत ठरेल, असेही मुंडे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा