महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या योग्य नियोजनाअभावी नागपूर जिल्ह्य़ात भारनियमनात वाढ झाली आहे. वीज वितरण यंत्रणा ठप्प पडल्याने गेल्या दोन दिवसापासून कामठी व मौदा तालुक्यातील अनेक गावे अंधारात आहेत. जिल्ह्य़ाचे मुख्य अभियंता  कामात दिरंगाई करीत असल्याचा आरोप करून त्यांची तातडीने बदली करण्याची मागणी आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्याचे ऊर्जामंत्री अजित पवार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
ऊर्जा राज्यमंत्री राजेंद्र मुळक आणि महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांनाही बावनकुळे यांनी निवेदन दिले आहे. जिल्ह्य़ात अनेक गावांमध्ये लोकसंख्या वाढीमुळे विजेच्या मागणीत वाढ झालेली आहे. सध्या अस्तित्वात असलेली वीज वहन क्षमतेची डी.पी. मागणीनुसार वीज पुरवठा करण्यास सक्षम नसल्याने वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे.  अनेकांची वीज उपकरणे नादुरुस्त होत आहेत.
जिल्ह्य़ात वीज वहन क्षमतेची डी.पी. लावणे व दुरुस्तीची कामे वेळेवर होत नाहीत. वेळेवर दुरुस्ती न केल्यामुळे नागरिकांना २४ तासांपेक्षा अधिक काळ भारनियमनाचा त्रास सहन करावा लागत आहे. मौदा, वडोदा, भूगाव, अरोली, कोदामेंढी, धानला परिसरातील गावांतील नागरिक भारनियमनाने त्रस्त झाले आहेत. मुख्य अभियंता हे अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंत्यांसोबत योग्य समन्वय ठेवत नाहीत, असा आरोप बावनकुळे यांनी केला आहे.
जिल्ह्य़ात कार्यक्षम मुख्य अभियंत्याची तातडीने नियुक्ती करावी, अशी मागणीही त्यांनी निवेदनातून केली आहे.

Story img Loader