‘कधीच वीज जात नाही’ असे शहर ही मुंबईची ओळख मंगळवार २ सप्टेंबर २०१४ रोजी पुसली गेली. ‘टाटा पॉवर कंपनी’चा ५०० मेगावॉटचा वीजसंच सकाळी पावणेदहा वाजता तांत्रिक बिघाडामुळे बंद पडला आणि दक्षिण मुंबईसह उपनगरातील बऱ्याच मोठय़ा भागात रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा खंडित झाला. काही ठिकाणी टप्प्याटप्प्याने तासाभराचे भारनियमन करावे लागले. या पाश्र्वभूमीवर मुंबईत अंधार नको असेल तर पारेषण यंत्रणा सक्षम करण्याबरोबरच ट्रॉम्बे येथील ‘टाटा पॉवर कंपनी’चा ५०० मेगावॉटचा वीजसंच क्रमांक ६ हा कोळशावर सुरू करण्यासाठी तातडीने उपाययोजना व्हायला हवी, अशी शिफारस राज्याच्या ऊर्जा विभागाने राज्य सरकारला केली आहे. हा वीजसंच कोळशावर सुरू करण्यावरून स्थानिक रहिवासी आणि शिवसेनेने राजकीय विरोध केला असताना आता ही शिफारस झाल्याने मुंबईतील अंधार की कोळशावरील वीजसंच असा पेच निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
ऐन गणेशोत्सवात ‘टाटा पॉवर कंपनी’चा ट्रॉम्बे येथील ५०० मेगावॉटचा वीजनिर्मिती संच तांत्रिक बिघाडामुळे सकाळी पावणेदहाच्या सुमारास बंद पडला. त्यामुळे अकस्मात ५०० मेगावॉटचा तुटवडा निर्माण झाला. मुंबईत विजेचा तुटवडा निर्माण झाल्यास महाराष्ट्राकडून विजेचा पुरवठा करून ही तूट भागवली जाते. त्यासाठी मुंबई व उपनगरातील वीजग्राहक वर्षांला ५०० कोटी रुपये ‘स्टँडबाय आकारा’पोटी देतात. मंगळवार सकाळी मुंबईत विजेची तूट भासताच महाराष्ट्राकडून २५० मेगावॉट मुंबईला पुरवण्यात आली. उरलेली २५० मेगावॉट वीजही उपलब्ध होती. पण मुंबईत बाहेरून वीज आणणाऱ्या पारेषण वाहिन्यांची क्षमता संपलेली होती. त्यातून आणखी २५० मेगावॉट वीज मुंबईत आणणे शक्य झाले नाही. या पाश्र्वभूमीवर राज्य सरकारने ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिवांची समिती नेमत परिस्थितीचा आढावा घेऊन अहवाल देण्यास सांगितले होते. दरम्यानच्या काळात निवडणुका जाहीर झाल्या. आता या अहवालातील तरतुदी समोर आल्या आहेत.
मुंबईतील वीजमागणीचा विचार करता ट्रॉम्बे येथील वीजकेंद्राची महत्त्वाची भूमिका आहे. या ठिकाणी अधिकाधिक वीजनिर्मिती होणे आवश्यक आहे. तरच वीजमागणीचा भार मुंबईतील वीजयंत्रणा पेलू शकते. त्यासाठी सध्या अपवादात्मक स्थितीत चालवण्यात येणारा आणि तेलासारख्या महाग इंधनावर चालणारा ५०० मेगावॉटचा संच क्रमांक सहा कोळशावर सुरू करणे आवश्यक आहे. तसे झाल्यास आपत्कालीन प्रसंगी वीज उपलब्ध होण्यात अडचण येणार नाही, असे ऊर्जा विभागाने दीर्घकालीन उपाययोजना सुचवताना नमूद केले आहे.
त्याचबरोबर ‘टाटा पॉवर’ने आपल्या २५० मेगावॉटच्या वीजसंचातून सातत्याने वीजनिर्मिती होत राहील याची काळजी घ्यावी व त्यासाठी जलदगतीने हालचाल करावी. अशा प्रकारचा वीजसंच असलेल्या इतर वीजकंपन्यांशी संपर्क साधून सुटे भाग मिळवावेत, अशा शब्दांत ‘टाटा’चे कानही या अहवालात टोचण्यात आले आहेत. संच क्रमांक ५ ची नियंत्रणप्रणाली आधुनिक डिजिटल यंत्रणेवर सुरू करावी, असेही या अहवालात म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा