दहावी, बारावीच्या परीक्षा संपताच वीज वितरण कंपनीचे भारनियमन नियमीतपणे सुरू झाले आहे. वीज वितरण, वसुली व गळती यांच्या प्रमाणावर शहराचे अ ते ग याप्रमाणे गट पाडण्यात आले असून विजेच्या उपलब्धतेनुसार कमीजास्त वेळेचे भार नियमन सुरू झाले आहे.
वीज नियामक आयोगाच्या आदेशाप्रमाणेच हे गट पाडण्यात आले आहेत. अ गटात वितरण व वसुली यांचे प्रमाण चांगले म्हणजे समाधानाकारक असल्याने तिथे कमी वेळ व ग गटात ते सर्वाधिक वाईट त्यामुळे तिथे जास्त वेळ भारनियमन अशी ही रचना आहे. ग गटात शेती व घरगुती अशा दोन्ही वर्गांचा समावेश असून या गटात पुन्हा ग १, ग २, ग ३ अशी वर्गवारी आहे. या गटाचे ग्राहक ग्रामीण भागात जास्त संख्येने आहेत त्यामुळे तिथे ८ तास किंवा त्यापेक्षाही जास्त काळ भारनियमन केले जाते.
शहरात ड गटापर्यंतचे फिडर (विभाग) आहेत. शहरात सायंकाळी साडेसहा नंतर भारनियमन केले जात नाही. अ गटासाठी २ तास व ड गटासाठी  ३ तासांचे भारनियमन आहे. सकाळी व सायंकाळी (प्रत्येकी दीड तास) अशा दोन गटात विभागून शहर हद्दीत भारनियमन केले जाते. ग्रामीण भागाची भारनियमनाची वेळ जास्त असल्याने तिथे सकाळी, दुपारी व सायंकाळी व अशा ३ वेळेत भारनियमन होते. ग ३ या गटात तर रात्रीच्या वेळेतही भारनियमन होते.
शहर हद्दीत एकूण १० फिडर आहेत. त्यात अ गटाचा एकही फिडर नाही. अर्बन फिडर (सथ्था कॉलनी, स्टेशन रस्ता व त्याच्या आसपासचा परिसर) हा एकमेव फिडर ब गटात आहे. तिथे सकाळी साडेसात ते ९ व दुपारी २ ते ४ यावेळात भारनियमन सुरू झाले आहे. स्वस्तिक, केडगाव, अशोक हॉटेल, गंजबाजार, माळीवाडा, बुऱ्हाणनगर हे ६ फिडर ड गटात असून त्या भागात सकाळी ६ ते ९.४५ व दुपारी १२.३० ते ३.१५ यावेळात भारनियमन होते. भिंगार फिडर क गटात येते व तिथे सकाळी ६ ते ८.३० व दुपारी १.४५ ते ४ यावेळात भारनियमन होते. दरेवाडी (ता. नगर) फिडर इ गटात येते. तिथे सकाळी ६ ते ९ व दुपारी १२. १५ ते ३.१५ यावेळात भारनियमन होते. बुरूडगाव या शेती असलेल्या परिसराचा समावेश ग ३ या गटात आहे. तिथे सकाळी ५.३० ते ९.३०, दुपारी १२. ३० ते २.४५ व सायंकाळी ७ ते रात्री ९ यावेळात भारनियमन होते.
वीज नियामक आयोगाच्या आदेशानुसार ही वर्गवारी करण्यात आलेली आहे. विजेच्या उपलब्धतेनुसार कुठे किती वेळ भारनियमन करायचे या वर्गवारीवरच ठरवले जाते अशी माहिती वीज वितरण कंपनीकडून देण्यात आली. जानेवारीच्या सुरूवातीला हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. मात्र त्यानंतर सरकारने १० व १२ वी च्या परिक्षाकाळात भारनियमन करायचे नाही असा धोरणात्मक निर्णय घेतला. त्यामुळे या वेळापत्रकाची अंमलबजावणीच झाली नाही. या परिक्षा संपताच लगेच भारनियमन सुरू झाले, मात्र अद्याप शाळांच्या (प्राथमिक व माध्यमिक) परीक्षा सुरू असून त्या विद्यार्थ्यांना भारनियमनला सामारे जावे लागत आहे.
इमर्जन्सी कपात वेगळीच  
या जाहीर भारनियमनाशिवाय वरून (म्हणजे थेट मुख्यालयातून) अनेकदा अचानक भारनियमन केले जाते. त्याला इमर्जन्सी लोड शेडिंग असेच म्हणतात. त्याची पुर्वकल्पना अर्थातच नसते. मात्र अशी वेळ फारशी येत नाही. पण आली तर त्याला येथील अधिकारी काहीही करू शकत नाही. ज्याप्रमाणे वीज पुरवठा खंडीत होते तसाच तो अचानक पुर्ववतही होतो. विजेची मागणी वाढत चालली आहे व त्याप्रमाणात विजेची निर्मिती कमी होत आहे, त्यामुळे आगामी काळात भारनियमन वाढणारच आहे असे कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.