महावितरणच्या वतीने सप्टेंबरपासून करण्यात आलेली वीज दरवाढ ही महाजनको या वीजनिर्मिती कंपनीस खापरखेडा, भुसावळ, कोराडी येथील तीन वर्षांपासूनच्या विस्तार कामाला झालेला विलंब व प्रकल्पाची वाढीव किंमत वसूल करण्यासाठी झाली आहे. सदरची संपूर्ण रक्कम महाजनकोला मिळणार असून त्यात महावितरण फक्त मध्यस्ताची भूमिका बजावणार असल्याची माहिती महावितरणचे संचलन संचालक मारुती देवरे यांनी दिली.
महावितरणच्या वतीने सप्टेंबरपासून केलेली वीज दरवाढ व करण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांविषयक चर्चेसाठी महावितरणचे देवरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी राम दोतोंडे, नाशिकचे मुख्य अभियंता के. व्ही. अजनाळकर, तसेच प्रशिक्षण विभागाचे मुख्य अभियंता चंद्रशेखर एस्मे यांसह महावितरणचे अनेक अधिकारी उपस्थित होते. त्या वेळी देवरे यांनी ही माहिती दिली. नाशिक इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (निमा)च्या पुढाकाराने औद्योगिक व व्यापारी संघटनांना एकत्र घेत नवीन वीज दरवाढीचा विरोध करण्यात आला. या वेळी व्यासपीठावर निमाचे अध्यक्ष मनीष कोठारी, माजी अध्यक्ष मधुकर ब्राह्मणकर, रमेश वैश्य, धनंजय बेळे, आयमाचे अध्यक्ष सुरेश माळी, नाइसचे उपाध्यक्ष संजीव नारंग, लघुउद्योग भारतीचे अध्यक्ष एम. जी. कुलकर्णी, निमाचे मानद सरचिटणीस मंगेश पाटणकर, चिटणीस मिलिंद चिंचोलीकर, ऊर्जा समितीचे अध्यक्ष मिलिंद राजपूत व आयमाचे व्यंकटेश मूर्ती उपस्थित होते.
आंदोलनाच्या पवित्र्याबद्दल मनीष कोठारी यांनी माहिती देत महाराष्ट्राबाहेर जात असलेले उद्योग व नव्याने खुंटलेली उद्योग वाढ यांस शासनाइतपत महावितरणही जबाबदार असल्याच्या भावना उद्योजकांनी व्यक्त केल्या. वीज दरात सातत्याने वाढ होत असून दैनंदिन वीजपुरवठय़ातील अनेक अडीअडचणी ब्राह्मणकर आणि बेळे यांनी व्यक्त केल्या. महावितरणचे संचलन संचालक देवरे यांनी इतर राज्यांच्या वीजनिर्मिती प्रकल्पांची गुंतवणूक रक्कम ही जवळपास वसूल झालेली असल्यामुळे वीज रास्त दरात देणे महाराष्ट्रालाही काही वर्षांनंतर परवडेल, अशी आशा व्यक्त केली. वीजपुरवठा सुधारणांसंदर्भात त्यांनी अनेक नवीन योजनांची माहिती दिली. महावितरणचे सर्व कामकाज हे ऑनलाइन पद्धतीने सुरू केले असून कुठेही उद्योजकांची अथवा वीजग्राहकांची अडवणूक होत असल्यास आपल्याशी थेट संपर्क साधावा, असे सांगत आपल्या विभागाच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.
महावितरणतर्फे पुढाकार घेत उद्योजकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महापारेषण, उद्योग सचिव आदी संलग्न विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. या वेळी येथील महावितरणचे के. एस. परदेशी, आर. डी. चव्हाण, पी. आर. हजारे, आर. एल. सोनुले, ए. आर. चव्हाण आदींसह अनेक उद्योजक उपस्थित होते.

Story img Loader