गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवसापासून पावसाने लावलेल्या दमदार हजेरीमुळे  ठाणे, कल्याण, डोंबिवली या शहरांमध्ये वीज खंडित होण्याचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर वाढले असून यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. गणेशोत्सवाच्या काळात वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे गणेशोत्सव मंडपातील काळोखाने कार्यकर्ते त्रस्त झाले आहेत. महावितरणच्या कार्यालयात दूरध्वनी केला तरी सततच्या व्यस्त असल्याच्या सूचनेने तर कार्यकर्ते वैतागले आहेत. त्यामुळे  नाराजीचा सूर व्यक्त होऊ लागला आहे. गणपतीच्या आरत्या, सजावटीमधील विद्युत रोषणाई आणि देखावे या बत्तीगुल कारभारामुळे बंद पडत आहेत. गेल्या पाच दिवसांपासून ही परिस्थिती निर्माण झाली असताना महावितरणच्या वतीने कोसळणारा पाऊस आणि तांत्रिक बिघाडाची कारणे पुढे केली जात आहेत.
गणेशोत्सवाच्या काळात विजेची सर्वाधिक आवश्यकता असताना महावितरणकडून मात्र समाधानकारक सेवा मिळत नसल्याचे ठाणे, कल्याण, डोंबिवलीमधील गणेशोत्सव मंडळांचे म्हणणे आहे. महावितरणने केलेल्या तातपुरत्या वीज जोडणीच्या आवाहनानंतर अनेक गणेश मंडळांनी तात्पुरती जोडणी घेतली. मात्र गणेश मंडपात वीज जोडणी केल्यापासून केवळ काही तासच वीजपुरवठा झाला असून जास्तीत जास्त वेळ वीज बंद असल्याचे चित्र या शहरांमध्ये दिसून येत आहेत. वीज नसल्याने गणेश मंडळाच्या मांडवामध्ये उसळणारी गर्दी घटली असून चलचित्र देखावे बंद करून ठेवण्याची नामुष्की मंडळांवर येऊन ठेपली आहे. कल्याण पूर्वेतील हनुमान सेवा मंडळ, बाल गणेश मंडळ या गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रविवारी महावितरणच्या कार्यालयामध्ये विजेच्या तक्रारीसाठी फोन केला असता त्यांना महावितरणच्या व्यस्त सेवेचा फटका सहन करावा लागला. या काळात सुमारे १० तास महावितरणच्या कोळसेवाडी कार्यालयाचा फोन व्यस्त असल्याची सूचना मिळत असल्याने कार्यकर्ते बेजार झाले होते.ना सूचना, ना भारनियमन..
ठाणे, कल्याण आणि डोंबिवली शहरांमध्ये कोणत्याही प्रकारचे भारनियमन नसल्याचे महावितरणच्या वतीने सांगण्यात येत असले तरी भारनियमनापेक्षाही जास्त तास या भागातील वीज गुल होऊ लागली आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी कल्याण शहरामध्ये कोणत्याही प्रकारचे भारनियमन अथवा तांत्रिक कामाच्या सूचना नसताना विजेचा पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. शनिवारी सायंकाळी ठाण्यामध्ये सुमारे दोन ते तीन तास वीज बंद होती. गोखले रोड, राममारुती रोड, नौपाडा या मध्यवर्ती आणि व्यापारी केंद्र म्हणून ओळख असलेल्या भागातही याचा मोठा फटका सहन करावा लागल्याने महावितरण विरोधात व्यापाऱ्यांनीही संताप व्यक्त केला आहे. रविवारी रात्री कल्याण पूर्वेमध्ये सुमारे आठ तासांहून अधिक काळ वीजपुरवठा बंद होता.
मुसळधार पाऊस आणि तांत्रिक बिघाडामुळे वीज बंद..
गणेश चतुर्थीपासून पावसाने जोर धरला असून त्यामुळे अनेक तांत्रिक बिघाड निर्माण होऊ लागले असून त्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याची समस्या निर्माण होऊ लागली आहे. कल्याण पूर्वेतील ट्रान्स्फॉर्मर उडाल्याने त्या भागात रविवारी रात्री वीजपुरवठा बंद होता. पावसामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे, असे महावितरणचे कल्याण परिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी भारत पवार यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा