कोळसा, तेल, पाणी यापासून होणाऱ्या वीजनिर्मितीला मर्यादा असून सौरऊर्जेपासून अमर्याद वीजनिर्मिती होऊ शकते. त्यातूनच देशाचे विजेचे संकट दूर होऊ शकते, असे मत पंजाबचे राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांनी यांनी व्यक्त केले.
औसा तालुक्यातील गोंद्री येथील श्री साईबाबा शुगर्स लि. या खासगी साखर कारखान्यातर्फे ५.७५ मेगावॉटचा ५२ कोटी खर्चाचा राज्यातील पहिला सौरऊर्जा प्रकल्प पूर्ण झाला. त्याच्या लोकार्पण सोहळय़ाच्या उद्घाटनप्रसंगी पाटील बोलत होते. ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर, खासदार पद्मसिंह पाटील, आमदार दिलीप देशमुख, बसवराज पाटील, अमित देशमुख, बाबासाहेब पाटील, वैजनाथ शिंदे व विजयकुमार देशमुख, आदित्य ग्रीन एनर्जीचे आदिनाथ सांगवे आदी उपस्थित होते.
चाकूरकर म्हणाले, की ३० वर्षांपूर्वी इंदिरा गांधी यांनी विज्ञान-तंत्रज्ञान मंत्रालयाची जबाबदारी आपल्याकडे सोपवली होती. त्या काळी सौरऊर्जेबाबत आपल्याला काही करता येईल का, अशी सूचना इंदिराजींनी केली होती. तेव्हापासून सौरऊर्जेसाठी आपण सतत आग्रहाने मत मांडत आलो आहोत. आजही सौरऊर्जेसाठी लागणारे पॅनेल्स व सेल तयार करण्याचे कारखाने आपल्याकडे उभे राहू शकले नाहीत. ते विदेशातून आयात करावे लागतात. या कामासाठी उद्योजकांनी पुढे येण्याची गरज आहे. भविष्यात विजेचे संकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतात व घरात छतावर सौरऊर्जेचे पॅनेल्स उभारले पाहिजेत. त्यासाठी सरकारने आवश्यक ते अनुदान दिले पाहिजे. एक मेगावॉट वीजनिर्मितीस ७ ते ८ कोटी रुपये खर्च येतो व प्रकल्प उभारणीस ५ ते ६ वर्षांचा कालावधी लागतो. याबाबत संशोधन होऊन ती रक्कम थेट शेतकऱ्यांना दिली गेली तर विहिरीतून पाणी उपसण्यापासून घरातील सर्व गोष्टींना लागणारी वीज २४ तास उपलब्ध होईल. यासाठी गरज आहे ती दृष्टी, सदसद्विवेक व धाडसाची. सरकारने लोकसहभाग घेऊन या कामाला वेग दिला पाहिजे. साईबाबा शुगर्सने राज्यातील सर्वात मोठय़ा सौरऊर्जेचे उत्पादन आपल्या जिल्हय़ात सुरू केले याचा आपल्याला मनस्वी आनंद होत असल्याचे ते म्हणाले.
जयंत पाटील यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. आमदार दिलीपराव देशमुख यांनी ‘साईबाबा’चा आदर्श अन्य कारखान्यांनी घ्यावा, असे आवाहन केले. राजेश्वर बुके यांनी प्रास्ताविक केले तर मोहन बुके यांनी आभार मानले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा