उन्हातान्हात काम करणाऱ्या विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगारांचे प्रश्न महत्त्वाचे असून, कामगार भरती, अनुकंपा तत्त्वावरील कामगारांचे प्रश्न, स्वतंत्र वेतनश्रेणीबाबत कंपनी व्यवस्थापनाने लक्ष घालण्याची गरज आहे. या प्रश्नांसाठी आपण सुरुवातीपासून प्रयत्नशील असून, काही प्रश्नांची सोडवणूक केली आहे. प्रलंबित प्रश्नांसाठी फेब्रुवारीमध्ये तिन्ही वीज कंपन्यांचे व्यवस्थापन, ऊर्जामंत्री व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक होईल असे विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.
विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे १६ व्या द्विवार्षिक महाअधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तांत्रिक कामगार युनियनचे केंद्रीय अध्यक्ष रामकिसन सोळंकी हे होते. युनियनचे केंद्रीय सरचिटणीस रणजीत देशमुख, उपसरचिटणीस आर. टी. देवकांत, जे. आ. घोंगडे, विष्णू स्वरूप पाटील, मिलिंद मणेरीकर, भगवान पाटील, गुलचंद ननावरे, कराड बाजार समितीचे सभापती दाजी पवार, पंचायत समितीचे सभापती देवराज पाटील, उपसभापती विठ्ठलतात्या जाधव यांच्यासह तांत्रिक कामगार युनियनचे सभासद, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, राज्यापुढे आज दुष्काळाचे भीषण संकट असून, या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्वानी सतर्क राहिले पाहिजे. तांत्रिक वीज कामगार संघटना कामगारांच्या प्रश्नांवर अनेक वर्षांपासून संघर्ष करीत आहे. संघटनांचे नेतृत्व विधायक विचारांचे असल्याने त्यांचे प्रश्न मार्गी लागतील यात शंका नाही. वीज महामंडळाच्या विभाजनावेळी कामगार संघटनांनी केलेले मोलाचे सहकार्य विसरण्यासारखे नाही. देशात वीज निर्मितीमध्ये वाढ करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
रामकिसन सोळंकी म्हणाले की, वीज कामगारांच्या प्रश्नांकडे कंपनी व्यवस्थापनाकडून दुर्लक्ष होत आहे. त्यांनी कामगारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा. कंपनीच्या सुधारणा प्रक्रियेला आमचा विरोध नाही मात्र, सुरुवातीला घेतलेल्या निर्णयावर ते ठाम राहात नाहीत. त्यांनी वीज कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष घालावे अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावा लागेल.
रणजीत देशमुख म्हणाले की, वीज कंपनी व्यवस्थापन कामगारांशी संवाद ठेवत नाही. उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री हेही कामगारांशी संवाद ठेवत नाहीत. याचाच फायदा वीज कंपनी घेत असून, कामगारांवर अन्याय करत आहे. कर्मचाऱ्यांची पेन्शन, स्वतंत्र वेतन वाढ यासह अनेक महत्त्वाचे प्रश्न वर्षांनुवष्रे प्रलंबित आहेत. यावर तातडीने सकारात्मक निर्णय व्हावा.
आर. टी. देवकांत म्हणाले की, पेन्शन, मेडिक्लेम, कामगार भरती, स्वतंत्र वेतनश्रेणी या प्रश्नांत कंपनी व्यवस्थापन लक्ष घालणार आहे की नाही, याबाबत लवकरात लवकर सकारात्मक निर्णय न झाल्यास आम्हाला उग्र आंदोलन करावे लागेल. यावेळी विठ्ठलतात्या जाधव यांचे भाषण झाले. प्रास्ताविक बी. आर. पवार यांनी केले. सूत्रसंचालन रूपाली देशमुख यांनी केले.

Story img Loader