डोंबिवली पश्चिमेतील देवीचा पाडा भागातील गोपीनाथ चौक परिसरात महावितरणच्या न्यूट्रल वाहिनीत अचानक बिघाड झाला. त्यामुळे विजेचा उच्च दाब अचानक वाढल्यामुळे या भागातील अनेक रहिवाशांच्या घरातील विजेची उपकरणे जळाल्याच्या तक्रारी आहेत. रविवारी याच परिसरातील रेतीबंदर चौक परिसरातही असाच प्रकार घडल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले.
टीव्ही, फ्रिज, गिझर, बल्ब, लॅपटॉप, सेटटॉप बॉक्स यांसारख्या उपकरणांचे यामुळे नुकसान झाल्याची माहिती येथील रहिवाशांनी दिली. देवीचा पाडा गोपीनाथ चौक भागातील माउली चाळ क्रमांक १, लक्ष्मीनारायण कृपा सोसायटी परिसराला वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणच्या वीजवाहिनीतील न्यूट्रल लाइनमध्ये शनिवारी सकाळी अचानक बिघाड झाला. त्यामुळे या परिसरातील घरांमध्ये उच्च दाबाने वीजपुरवठा झाला. या वेळी घरांमधील स्वच्छतागृहांमध्ये बसविण्यात आलेल्या गीझरमधून धूर येऊ लागला. ज्या रहिवाशांनी सकाळी घरातील विजेची उपकरणे सुरू करण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी शॉर्टसर्किट होऊन ती जळाल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत.
महावितरणचे डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र मशाळकर, उपअभियंता गुनाडे यांनी तात्काळ आपले कर्मचारी घटनास्थळी पाठवले. त्या वेळी त्यांना या भागाला वीजपुरवठा करणाऱ्या न्यूट्रल लाइनचा वीजपुरवठा तोडण्यात आलेल्या स्थितीत आढळला. त्यामुळे वीज प्रवाहात उच्च दाबाची वाढ झाली असल्याचे कर्मचाऱ्यांना समजले. कर्मचाऱ्यांनी तात्पुरती पर्यायी सुविधा या भागात करून दिली आहे. विकासकांनी इमारतीमध्ये वीजपुरवठा देतानाच ‘ट्रिप’ यंत्रणा बसविणे आवश्यक आहे. वाढीव खर्चामुळे विकासक या सोयी सदनिकाधारकांना देत नाहीत, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. गोपीनाथ चौक भागातील उच्चदाब प्रकरण न्यूट्रल लाइनमध्ये बिघाड झाल्याने झाले आहे. त्यामध्ये महावितरणचा थेट दोष नाही, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दोष दूर करण्यासाठी या भागात वीजवाहिनी टाकण्याचे काम करण्यात येत आहे.
डोंबिवलीत विजेचा झटका.. नागरिकांना फटका
डोंबिवली पश्चिमेतील देवीचा पाडा भागातील गोपीनाथ चौक परिसरात महावितरणच्या न्यूट्रल वाहिनीत अचानक बिघाड झाला. त्यामुळे विजेचा उच्च दाब अचानक वाढल्यामुळे या भागातील अनेक रहिवाशांच्या घरातील विजेची उपकरणे जळाल्याच्या तक्रारी आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 06-08-2014 at 07:36 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Electronic gadgets get damage due to improper electricity in dombivli