पन्नासहून अधिक विविध प्रकारची शोभिवंत मत्स्यालये, कायद्याच्या चौकटीत राहून पाळता येण्यासारखे अनेक विदेशी पक्षी, आणि चांगल्या जातीचे कुत्रे-मांजरी पहाण्याची आणि विकत घेण्याची संधी वर्षांच्या सुरुवातीसच मुंबई विद्यापीठाच्या प्रांगणात मुंबईकरांना मिळणार आहे. ३ ते ६ जानेवारी या कालावधीत मुंबई विद्यापीठाचा बहिशाल शिक्षण विभाग आणि संजीवन ट्रस्ट यांनी संयुक्तरित्या आयोजित केलेले शोभिवंत मासे, पक्षी आणि इतर पाळीव प्राण्यांचे तिसरे प्रदर्शन नवीन वर्षांत मुबंईकरांच्या भेटीसाठी येत आहे. सकाळी दहा वाजल्यापासून ते सायंकाळी साडेसातपर्यंत हे प्रदर्शन पाहाता येईल. मुबंई विद्यापीठाच्या विद्यानगरी येथील स्र्पोट्स् कॉम्प्लेक्समधील इनडोअर स्टेडियममध्ये हे प्रदर्शन असणार आहे. गुरुवार ३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता कुलगुरू डॉ. राजन वेळूकर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होईल.
या प्रदर्शनातील इतर कार्यक्रमांत मत्स्यालय सजविणे, मासे पाळणे, पक्षी पाळणे, वाढविणे या विषयांवर छोटय़ा कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. तसेच काही विशिष्ट जातींचे पक्षी आणि मासे यांच्या संदर्भातील स्पर्धा घेण्यात येणार आहेत. तसेच प्राण्यांना आवश्यक असलेले समतोल अन्नही विक्रीसाठी उपलब्ध असेल. या प्रदर्शनात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, जिजामाता उद्यान आणि पशु कल्याण मंडळ यांचेही स्टॉल्स असतील. राष्ट्रीय उद्यानाच्या स्टॉलमधून टॅक्सीडर्मी कौशल्याची ओळख करून दिली जाणार आहे. या प्रदर्शनात अनेक पशूवैद्यकतज्ज्ञही सहभागी होत आहेत. प्रदर्शनात असलेल्या जीवांची काळजी घेण्याबरोबरच प्रेक्षकांच्या शंकांचे निरसन हे पशुवैद्यकतज्ज्ञ करणार आहेत.
मुंबई विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयांतील प्राणीशास्त्र विषयाचे अनेक विद्यार्थी या प्रदर्शनासाठी स्वयंसेवक म्हणून काम करीत असून त्यामुळे प्रेक्षकांना सुलभपणे शास्त्रीय माहिती मिळू शकेल. सकाळी दहा ते दुपारी एक या काळात भेट देणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना सवलतीत तिकिटे देण्यात येतील. अपंगांच्या किंवा अन्य दुर्बल गटांतील शाळांच्या विद्यार्थ्यांना निशुल्क प्रवेश असेल. त्यासाठी अशा संस्थांनी बहिशाल शिक्षण विभागाशी दूरध्वनी क्रमांक ६५९५२७६१, २६५३०२६६ वर संपर्क साधावा.या निमित्ताने प्रदर्शनाबाहेर मांडल्या जाणाऱ्या फूडस्टॉल्समध्ये काही महिला बचत गटांच्या, तसेच कोळी समाजाच्या स्टॉल्सचाही सहभाग असणार आहे. त्यामुळे हे प्रदर्शन एक पर्वणी ठरणार आहे.   

Story img Loader