नृत्याविष्कारासह नृत्याच्या गतीचे छायाचित्रण करणे हे मोठेच कसब मानले जाते. औरंगाबादकर किशोर निकम या हरहुन्नरी छायाचित्रकाराने मात्र कल्पकतेतून हे कसब साध्य केले. त्याच्या या आगळ्या कलाप्रकाराला आता सन्मानाची पावती मिळते आहे. राज्याच्या पर्यटन विभागातर्फे उद्या (शनिवारी) व रविवारी असे दोन दिवस आयोजित एलिफंटा महोत्सवात विशेष छायाचित्रण करण्यासाठी किशोरला निमंत्रित करण्यात आले आहे. छायाचित्रांमधून नृत्याची गती टिपण्याच्या अपूर्व कलाप्रकारावर प्रभुत्व प्राप्त केलेल्या किशोरकडून या महोत्सवात सादर होणाऱ्या नृत्यांचे छायाचित्रण करवून घेण्यात येणार आहे.
एलिफंटा महोत्सवाचे उपग्रहाद्वारे थेट प्रक्षेपण मुंबई शहरातील दोन-तीन महत्त्वाच्या ठिकाणी मोठे स्क्रीन लावून करण्यात येणार आहे. महोत्सवाला उपस्थित राहू न शकणाऱ्या प्रेक्षकांसाठी ही पर्वणी असेल. या थेट प्रक्षेपणात किशोर निकम टिपणार असलेली छायाचित्रे व त्यातील गती सादर केली जाणार आहे. याशिवाय किशोरने टिपलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शनही राज्यभर विविध ठिकाणी भरविण्यात येणार आहे.
गतवर्षी मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये किशोरने वेरुळ महोत्सव व इतर कलामहोत्सवात टिपलेल्या गतिशील छायाचित्रांचे ‘नृत्यविभ्रम’ हे प्रदर्शन भरविले होते. कलाक्षेत्रातील अनेक दिग्गजांनी प्रदर्शनाला भेट देऊन किशोरच्या या आगळ्या प्रयोगाची प्रशंसा केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा