लोकसभेच्या निवडणुकीचा महत्त्वाचा म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा पहिला टप्पा पार पडलेला आहे. शिमग्यानंतर वातावरणात बदल होऊन दिवसेंदिवस जिल्ह्य़ातील तापमान वाढतच आहे. याबरोबरच लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचाही पारा वाढणार आहे. शेवटच्या दिवशी एकूण १७ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने या लोकसभा मतदारसंघातून आतापर्यंत उमेदवारी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांची संख्या ४८ झाली आहे. त्यामुळे उमेदवारांची भाऊगर्दी राहणार असल्याचे निश्चित झाले आहे.
प्रत्येक उमेदवाराने अर्ज दाखल करताना आपापल्या परीने शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. यात काँग्रेस-राष्ट्रवादी-पीरिपा आघाडीचे प्रफुल्ल पटेल व भाजप-सेना महायुतीचे नाना पटोले तुल्यबळ राहिले. मात्र, या दरम्यान भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील परिसरात ‘मोदी वाले व रोजी वाले’ अशी टीकात्मक चर्चा सुरू होती. २४ मार्चपासून उमेदवारी अर्जांची छाननी होऊन २६ मार्चला दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असल्याने िरगणातील उमेदवारांपकी २६ मार्चपर्यंत कुठले उमेदवार या निवडणुकीतून बाहेर पडतात, याकडे सर्व मतदारांचे लक्ष लागले आहे. इतकेच नव्हे, तर या संदर्भात विविध राजकीय हालचालींनाही वेग आला आहे. पीरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल न करता प्रफुल्ल पटेल यांना समर्थन जाहीर केल्याने मतदारसंघातील त्यांच्या समर्थक दलित मतदारात नाराजीचा सूर असून याचा हिशेब बटन दाबूनच चुकविणार असल्याचे मत रिपब्लिकनच्या नेत्यांनी बोलून दाखविले आहे.  
 राष्ट्रीय पक्षातील उमेदवार पुढील व्यूहरचना आखून कामाला लागले आहेत. त्याच व्यूहरचनेचा भाग म्हणून २८ मार्चला भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची गोंदियाला विशाल जनसभा, तर ‘आप’चे उमेदवार प्रशांत मिश्रा यांच्या प्रचारासाठी ७ एप्रिलला गोंदियात अरिवद केजरीवाल यांची सभा आयोजित झाल्याची माहिती आहे. आघाडीतील आपली उमेदवारी निश्चित असल्याने प्रफुल्ल पटेल यांनी गेल्या चार महिन्यांपासून जनसंपर्क  वाढवून भेटीगाठीचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे. विकासाच्या मुद्यांवर भर देऊन जास्तीत जास्त प्रमाणात मतदारांपर्यंत पोहोचण्याचे तंत्र ते अवलंबित आहेत. भाजप-सेना महायुतीच्या उमेदवारांची घोषणा शिवरात्रीच्या दिवशी झाली असल्यामुळे उमेदवार नाना पटोले यांनी आपला प्रचारकार्य गेल्या एक महिन्यांपासून जोमात सुरू केला आहे, तसेच त्यांच्या समर्थकांचा भर ‘मोदी लाटेकडे’ आहे. मोदी लाटेवर बसून ते या लोकसभेरूपी वैतरणीला सहज पार करू शकतील, असे गेल्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून २ लाख मते घेणाऱ्या नाना पटोले यांना वाटत असावे, तर ‘आप’चे उमेदवार प्रशांत मिश्रा यांना अरिवद केजरीवालांचा झाडू सर्वांना साफ करणार, हा विश्वास असल्याने त्यांचा जोर फक्त टोप्या वाटप करण्यावरच थांबले आहेत. मात्र, मतदारांचा कानोसा घेतला असता ते आजही उघड-उघड काहीच बोलायला तयार नाहीत. सध्या ठरविलेले नाही, मतदानाच्या वेळी आम्ही योग्य तो निर्णय घेऊ, असे म्हणून या निवडणुकीतील रंगत ते वाढविण्याचा प्रयत्न करीत असल्याने येणाऱ्या कालावधीत विविध राजकीय पक्ष व निवडणुकीतील उमेदवारांच्या ‘प्रचाराचा पारा’ दिवसागणिक वाढणाऱ्या तापमानाप्रमाणे चढतच जाणार आहे.

Story img Loader