येथे होणाऱ्या अकराव्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी हनुमंत उपरे, तर कार्याध्यक्षपदी कॉ. नामदेव चव्हाण यांची निवड करण्यात आली. धर्मग्रंथांची नव्याने चिकित्सा ते मराठी साहित्यातील फुले, शाहू, आंबेडकरी विचारांच्या प्रतिबिंबापर्यंत अनेक विषयांवर संमेलनात चर्चा होणार आहे. त्यामुळे शेतकरी, कष्टकरी, उपेक्षित व आदिवासींच्या प्रश्नांना संमेलनाच्या रुपाने व्यासपीठ मिळणार असल्याची माहिती प्राचार्य मोतीराम राठोड यांनी दिली.
येत्या २२ व २३ डिसेंबरला हे संमेलन होणार आहे. संमेलनाच्या स्वागताध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांची घोषणा रविवारी करण्यात आली. सत्यशोधक ओबीसीचे संस्थापक हनुमंत उपरे स्वागताध्यक्ष, तर कॉ. नामदेव चव्हाण कार्याध्यक्ष आहेत. अ‍ॅड. अविनाश गंडले संयोजक, तर मुख्य निमंत्रक प्राचार्य पी. बी. सावंत आहेत.
विद्रोही साहित्य संमेलन हा प्रकार बीडकरांसाठी नवा असून, गेल्या काही वर्षांत सांस्कृतिक भूक भागवणाऱ्या अनेक चळवळी सक्रिय आहेत. मराठवाडा साहित्य परिषदेचे संमेलन, अखिल भारतीय नाटय़ संमेलन यशस्वी झाले. त्याच पद्धतीने विद्रोही साहित्य संमेलनही यशस्वी करण्याचा संयोजन समितीचा प्रयत्न आहे.
असंघटित कामगार, महिलांच्या प्रश्नांवर सरकार गंभीर आहे का? संविधानातील मूल्यांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत का पोहोचली नाही आणि फुले, शाहू, आंबेडकरी विचार चळवळीचे प्रतिबिंब मराठी साहित्यात पडले आहे का, हे संमेलनातील महत्त्वाचे परिसंवाद आहेत.
 शिक्षणाचे व्यापारीकरण, सवंग लोकप्रियतेसाठी होणारी आंदोलने, धर्मग्रंथांची नव्याने चिकित्सा, बहुजन समाजाचे प्रश्न व पत्रकारिता यांसह इतर अनेक विषयांवर गटचर्चा, विद्रोही कथाकथन, विद्रोही शाहिराचा जलसा आणि काव्यमैफल हे कलाप्रकारही सादर केले जाणार आहेत.   

Story img Loader