भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीने नितीन गडकरींसारख्या ‘रिजेक्ट’ केलेल्या नेत्याला उमेदवारी दिल्यामुळे त्यांना नागपुरातून ‘रिजेक्ट’ करा, असे आवाहन करीत संसदीय कामकाज मंत्री आणि काँग्रेसचे नेते राजीव शुक्ला यांनी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वावर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली.
लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी शहर काँग्रेसतर्फे देवडिया भवनात आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांंच्या बैठकीत शुक्ला बोलत होते. कार्यक्रमाला खासदार आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई, खासदार विलास मुत्तेमवार, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, शहर अध्यक्ष विकास ठाकरे, आमदार दीनानाथ पडोळे आदी नेते उपस्थित होते.
नितीन गडकरी यांच्यावर अनेक आरोप असल्यामुळे त्यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ‘रिजेक्ट’ केल्यानंतर त्यांना नागपुरातून निवडणूक लढण्याची संधी दिली आहे. गडकरी हे संघाचे समर्थक असले तरी त्यांची पक्षावर पकड नाही. नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत गडकरी यांना राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून पायउतार व्हावे लागले होते. पक्षाने नाकारलेल्या अशा नेत्याला उपराजधानीत उमेदवारी दिली असेल तर नागपुरातून जनतेने त्यांना ‘रिजेक्ट’ करावे, असे आवाहन केले.
अजूनही वेळ गेली नाही, गडकरी यांना मतदारसंघ बदलविण्याची संधी आहे त्यामुळे त्यांनी दुसरीकडे जागा शोधलेली बरी अन्यथा त्यांचा पराभव निश्चित आहे. लोकसभा निवडणूक हे काँग्रेससमोरचे मोठे आवाहन आहे. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेसच सत्तेवर येणार आहे. मात्र, त्यासाठी कार्यकत्यार्ंना मेहनत घ्यावी लागणार आहे.
नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येक सभेवर कोटय़वधी रुपये खर्च केले जात असताना हा पैसा आणला कुठून असा सवाल शुक्ला यांनी उपस्थित केला. नागपूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून तो कायम ठेवावा. असे आवाहन शुक्ला यांनी केले.
लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी होणाऱ्या काँग्रेसच्या बैठकीला केंद्रीय नेतृत्व उपस्थित असताना रोहयो मंत्री नितीन राऊत, माजी मंत्री अनीस अहमद आणि अर्थराज्य मंत्री राजेंद्र मुळक अनुपस्थित होते.
गेल्या लोकसभा निवडणुकीत तीन पैकी दोन नेत्यांनी मुत्तेमवारांच्या विरोधात बंड पुकारले होते. नाराज असलेल्या दोन्ही नेत्यांची जबाबदारी सतीश चतुर्वेदी यांच्यावर सोपवावी, असे आवाहन शुक्ला यांनी केले. यावेळी हुसेन दलवाई यांनीही भाजप व संघावर टीका केली.

Story img Loader