क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने शनिवारी निवृत्ती घेतल्यावर क्रिकेटप्रेमी कोल्हापूरकरांच्या डोळ्यात अश्रू तरळले. पण काही तासातच देशातील सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ हा पुरस्कार लाडक्या सचिनला जाहीर झाल्यावर अवघ्या शहरात आनंदाची लाट पसरली. एका डोळ्यात आसू अन् दुसऱ्या डोळ्यात हासू अशा समिश्र भावावस्थेत कोल्हापूरकरांचा आजचा दिवस गेला. फेसबुक, ट्विटर यासारख्या सोशल मीडियामध्ये क्रिकेट विश्वात अव्दितीय कामगिरी करणाऱ्या सचिनविषयीच्या कौतुक-अभिनंदनाच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला. तर जनमाणसातील चर्चेचा केंद्रबिंदू केवळ सचिन अन् सचिनच राहिला. हॉकीप्रेमी खेळाडूंनी मात्र हॉकीचा जादूगार ध्यानचंद यांना भारतरत्न पुरस्कार द्यायला हवा होता, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.    
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर २०० वा कसोटी सामना खेळणाऱ्या सचिन तेंडुलकरने या सामन्याच्या समाप्तीनंतर क्रिकेट जगतातून निवृत्ती घेण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर केला होता. काल दुसरा डाव खेळताना विंडीजची अवस्था नाजूक होती. त्यामुळे शनिवारी भारताचा विजय निश्चित होता. सचिनची निवृत्ती ही आजच होणार याची अटकळ बांधून क्रिकेटप्रेमी कोल्हापूरकर सकाळपासूनच टीव्हीसमोर खिळून राहिले होते. विंडीजचा संघ कोसळत चालला तसतसा आनंद व्यक्त केला जात असतानाच सचिनच्या निवृत्तीची हुरहुरी सर्वाना लागली होती. भारताच्या कसोटी विजयापेक्षा सचिनची निवृत्ती हाच क्रिकेट रसिकांच्या चर्चेचा विषय होता. विंडीजचा अखेरचा फलंदाज गारद झाल्यावर घरोघरी टीव्हीसमोर ठाण मांडलेल्या क्रिकेटरसिकांनी घरातही उभे राहून सचिनला मानवंदना देण्यास सुरुवात केली. दोन तपाहून अधिक काळ क्रिकेटच्या खेळाचा अपरिमित आनंद देणाऱ्या सचिनला गुडबाय करताना सामान्य नागरिकांचाही अश्रूंचा बांध फुटला. हेलावलेल्या मनानेच सचिनचा प्रत्येक चाहता त्याच्या नावाचा जयघोष करीत निरोप घेत राहिला. सचिनला जितके दु:ख झाले तितकेच दु:ख क्रिकेटवेडय़ा करवीरकरांच्या चेहऱ्यावरही दिसत होते.    
सचिनच्या निवृत्तीने क्रिकेटप्रेमींचे चेहरे काळवंडलेले होते. पण अवघ्या काही तासातच भारत सरकारने त्याला ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार देण्याची घोषणा केली आणि अवघ्या कोल्हापुरात आनंदाला उधान आले. शासनाच्या धोरण लकव्यामुळे सामान्यजणात शासनाविषयी तिटकाऱ्याची भावना निर्माण झाली होती. पण कधी नव्हे ते अचूक वेळ साधत शासनाने सचिनला भारतरत्न दिल्याबद्दल आनंदी प्रतिक्रिया उमटू लागल्या. पुरस्कारासाठी कधीही न खेळणाऱ्या सचिनला भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार मिळाल्याचा परमानंद शब्दाशब्दातून व्यक्त होत राहिला. तब्बल दोन तपे क्रिकेट खेळाचा आनंद देणारा लाडका सचिन या पुरस्काराचा मानकरी झाल्यामुळे शहरात दिवाळी नंतरची दिवाळी पहायला मिळाली. भारतरत्न पुरस्कार आईला अर्पण करीत असल्याचे सचिनने स्पष्ट केल्यावर माता-भगिनी चांगल्याच भावूक झाल्या होत्या. कोल्हापूर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बाळ पाटणकर यांनी भारत सरकारने सचिन तेंडुलकर याला योग्य वेळी भारतरत्न पुरस्कार देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आनंद व्यक्त केला. सचिनने गेली २४ वर्षे खेळ व खिलाडू वृत्तीचे दर्शन घडविले ते अव्दितीय होते. निवृत्तीनंतर तो क्रिकेटसह सर्व खेळांसाठी मार्गदर्शन करीत राहील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
हॉकीपटूंच्या मनी ध्यानचंद
क्रीडा क्षेत्रातील पहिला भारतरत्न सचिन तेंडुलकर यास जाहीर झाला असला तरी गेले काही महिने मेजर ध्यानचंद या हॉकीपटूस हा पुरस्कार देण्याविषयीची चर्चा सुरू होती. त्यामुळे आज हॉकीपटूंनी ध्यानचंद यांना भारतरत्न जाहीर करायला हवा होता, याची प्रतिक्रिया बोलून दाखविली. हॉकीतील असाधारण कामगिरी, देशप्रेमाची अजोड प्रचिती दाखविणारे ध्यानचंद हे खरे भारतरत्नाचे मानकरी आहेत, अशी प्रतिक्रिया कोल्हापूर जिल्हा हॉकी असोसिएशनचे अध्यक्ष विजय साळोखे-सरदार यांनी व्यक्त करतानाच सचिनला मिळालेल्या पुरस्काराबद्दल अभिनंदनही केले.

Story img Loader