महापौर सागर नाईक यांच्या दौऱ्यापूर्वी जेसीबी यंत्रांना पाचारण करत गल्लोगल्ली साचलेले कचऱ्याचे ढीग उपसून नवी मुंबईची ‘सफाई’ करणाऱ्या नवी मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांनी महापौरांची पाठ वळताच पुन्हा एकदा नाकर्तेपणा धोरण अवलंबिल्याने शहरातील नाक्यानाक्यांवर कचरा साचू लागला आहे. विशेष म्हणजे, महापौर शहरी भागातून फिरणार हे लक्षात आल्याने महत्त्वाच्या उपनगरांमधील काही ठरावीक कचराकुंडय़ा रिकाम्या करण्यात आल्या. मात्र, घणसोली, तळवली, राबाडा, नेरुळ, सारसोळे अशा गावांमध्ये कचऱ्याचे ढीग साचले असून ऐन पावसाळ्यात शहरातील साफसफाईचा प्रश्न गंभीर बनला आहे.   
ठेकेदाराच्या असहकारामुळे घंटागाडीचा प्रयोग पुरता फसल्याने नवी मुंबईतील सर्वच उपनगरांमध्ये गेल्या महिनाभरापासून कचऱ्याचे ढीग साचले आहेत. पावसाळ्यापूर्वी शहरात समाधानकारक नालेसफाई झालेली नाही अशा स्वरूपाच्या तक्रारी वाढू लागल्यामुळे सोमवारी महापौर नालेसफाईची पाहणी करण्यासाठी निघाले. खरे तर महापौरांनी अशा स्वरूपाचा दौरा पाऊस सुरू होण्यापूर्वी आयोजित करायला हवा होता. मात्र, मुसळधार पावसात महापौरांनी वरातीमागून घोडे दामटल्याने अधिकारीही त्यांच्यासोबत या पाहणीसाठी निघाले. महापौरांचा दौरा नालेसफाईशी संबंधित असला तरी धास्तावलेल्या अधिकाऱ्यांनी नवी मुंबईतील सर्व प्रमुख उपनगरांमध्ये साचलेला कचरा उचलण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम हाती घेतली. घाणीने वाहू लागलेल्या कचऱ्याकुंडय़ा रिकाम्या करण्यासाठी शहरभर वाहने फिरली. रस्त्यावर चोहोबाजूंनी पसरलेला कचऱ्याचा ढीग उपसण्यासाठी चक्क जेसीबी यंत्रांचा वापर करण्या आला. महापौरांच्या आगमनापूर्वी नवी मुंबईचा कानाकोपरा सोमवारी स्वच्छ झाला खरा, मात्र या दौऱ्यानंतरही मंगळवारी पुन्हा कचराकुंडय़ा तुंबून वाहू लागल्याने रहिवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
गावांमध्ये घाणीचा पूर
कचरा वाहतुकीचे कंत्राट यापूर्वीच वादात सापडले असताना नव्या कामाच्या निविदा प्रक्रिया रखडल्याने सद्यस्थितीत सुरू असलेले काम अतिशय मंदगतीने सुरू आहे. कचरा वाहतुकीचे कंत्राट नव्या ठेकेदाराला दिले जाणार असल्यामुळे सध्याचा ठेकेदार कचरा उचलण्यात दिरंगाई करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नवी मुंबईच्या नाक्यानाक्यांवर कचरा साचल्याचे सध्याचे चित्र आहे. गावांमध्ये तर अतिशय वाईट परिस्थिती असून या परिसरातील कचरा वेळेवर उचलला जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होऊ लागला आहे. महापौरांच्या दौऱ्यानंतरही घणसोली, तळवली, राबाडा अशा गावांमधील कचरा उचलला गेला नव्हता, अशी माहिती तेथील ग्रामस्थांनी दिली. ऐरोली, दिघा परिसरातही कचरा सफाई होत नसल्याचे चित्र आहे. सारसोळे, नेरुळ, करावे, शिरवणे या गावांमधील कचरा वाहतूकही रखडली आहे. त्यामुळे तेथेही कचऱ्याचे ढीग साचल्याचे चित्र आहे. महापौरांच्या दौऱ्यानंतर वाशी, सानपाडा, नेरुळ या उपनगरांमधील कचराकुंडय़ामधील कचरा मंगळवारी दिवसभर उचलला गेला नव्हता. एरवी स्वच्छतेच्या नावाने डंका पिटणाऱ्या नवी मुंबई महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी कचरा वाहतुकीच्या निविदा नेमक्या कोणामुळे रखडल्या आहेत, याविषयी मूग गिळून बसले आहेत. त्यामुळे शहरातील सफाईचे मात्र तीनतेरा वाजल्याचे चित्र सध्या दिसू लागले आहे.

Story img Loader