आंतरराष्ट्रीय विमानतळ, नयना प्रकल्प आणि मेट्रोसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्याच्या तयारीत असणाऱ्या सिडकोसमोर आता कर्मचारी व अधिकाऱ्यांचा तुटवडा भासू लागला आहे. दर महिन्याच्या शेवटी सरासरी २० कर्मचारी सेवानिवृत्त होत असून मेअखेर २६ कर्मचाऱ्यांना निरोप देण्यात आला. १७ मार्च १९७० रोजी स्थापन झालेल्या सिडकोतील बहुतांशी कर्मचारी- अधिकारी आता सेवानिवृत्तीच्या उंबरठय़ावर आहेत. त्या वेळी सिडकोत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांनी आता वयाची ५८ वर्षे गाठली आहेत. प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्यामध्ये सामावून घेण्यात यावे, या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला पांठिबा देताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सिडकोतील सर्वच नोकरभरतीला सध्या स्थगिती दिली आहे. त्यामुळे या कर्मचारी तुटवडय़ात आणखी भर पडली असून, विद्यमान कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार ओव्हरटाइम मिळत नसल्याने कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे अनेक कर्मचारी-अधिकाऱ्यांची मन:स्थिती खालावली आहे.सिडकोतील शेवटच्या कर्मचाऱ्यांचा आकडा दोन हजार २५४ होता. त्यातील एक हजार ५३ कर्मचारी शिल्लक राहिल्याने ८०० कर्मचारी मागील ४४ वर्षांत सेवानिवृत्त झाले आहेत. अनेक कर्मचाऱ्यांचे निधन झाले आहे, पण त्या जागी अनुकंपा तत्त्वावर त्यांच्या वारसदारांना सिडकोने सामावून घेतल्याने ही तूट काही प्रमाणात कमी झाली आहे. सेवानिवृत्त होण्यामध्ये अभियंता, वास्तुविशारद, नियोजनकार, ड्राप्समन यांसारख्या तांत्रिक कर्मचाऱ्यांबरोबरच चालक, शिपाई, लेखनिक यांसारखा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.