ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘व्याघ्र भत्ता’ मिळत असल्याने इतर भागांतील वन कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे. वाघ व बिबटय़ांच्या हल्ल्याचे प्रमाण ताडोबाबाहेरील जंगलात अधिक आहे. अशा स्थितीत चंद्रपूर, ब्रह्मपुरी व मध्य चांदा वन खात्यात कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना व्याघ्र भत्ता मिळणे गरजेचे असताना केवळ ताडोबाला भत्ता मिळत असल्याने व्याघ्रहल्ल्यांकडे अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पट्टेदार वाघांचे आश्रयस्थळ असलेला जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प या जिल्हय़ात आहे. ताडोबा तसेच या जिल्हय़ातील जंगलात वाघ आणि बिबटय़ांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे या जिल्हय़ात एक-दोन दिवसांआड वाघ, बिबटय़ांच्या हल्ल्याच्या घटना घडत असतात. तसेच जंगल क्षेत्रालगतच्या गावात मानव व वन्यप्राणी संघर्षांच्या घटनांमध्येसुद्धा वाढ झालेली आहे. मात्र वन अधिकारी व कर्मचारी अशा घटनांकडे कानाडोळा करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याला कारण ताडोबा व्याघ्र प्रकल्पातीत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळत असलेला विशेष व्याघ्र भत्ता कारणीभूत ठरले आहे. ताडोबा प्रकल्पाचे क्षेत्र संचालकांना पगाराव्यतिरिक्त दर महिन्याला दोन हजार रुपये व्याघ्र भत्ता मिळतो, तर उपक्षेत्र संचालकांना १५०० रुपये, अतिरिक्त क्षेत्र संचालकांना १३०० रुपये, वनपरिक्षेत्र अधिकारी १०००, फॉरेस्टर ९०० व फॉरेस्ट गार्ड व लिपिकाला ७०० रुपये महिना व्याघ्र भत्ता मिळतो. मात्र ताडोबाबाहेर काम करणाऱ्या चंद्रपूर वन विभाग, ब्रह्मपुरी वन विभाग व मध्य चांदा वन विभागातील एक हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांना व्याघ्र भत्ता मिळत नाही. त्यामुळे चंद्रपूर, ब्रह्मपुरी व मध्य चांदा वन विभागातील एक हजार कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यामुळेच चंद्रपूर, ब्रह्मपुरी वा मध्य चांदा वन विभागांतर्गत येणाऱ्या जंगलात वाघ व बिबटय़ाच्या हल्ल्याची एखादी घटना झाली, तर वन अधिकारी व कर्मचारी त्याकडे लक्ष देत नाही. गेल्या वर्षभराचा विचार केला, तर वाघ व बिबटय़ाच्या हल्ल्यात चौदा जणांचा बळी गेला. जवळपास दहा बिबटय़ांना या वर्षी जेरबंद करण्यात आले, तर बिबटय़ा व वाघाच्या हल्ल्यांच्या शंभरावर घटना घडल्या. यातील बहुतांश घटना या ताडोबा प्रकल्पाबाहेरच्या आहेत.
या वर्षी वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या १४ जणांपैकी आठ जण व्याघ्र प्रकल्पाच्या बाहेरील आहेत. वाघ व बिबटय़ाच्या हल्ल्याच्या घटना व्याघ्र प्रकल्पाच्या बाहेर अधिक होत असताना ताडोबातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना व्याघ्र भत्ता कसा देण्यात येतो, यामुळे वन खात्यात तीव्र असंतोष खदखदत आहे.
 दुसरीकडे व्याघ्र भत्ता मिळत असल्याने वन खात्यातील बहुतांश अधिकारी व कर्मचारी ताडोबा व्याघ्र प्रकल्पात काम करण्यास इच्छुक आहेत. एकीकडे व्याघ्र भत्तासुद्धा मिळतो आणि दुसरीकडे कामसुद्धा कमी आहे. याउलट चंद्रपूर, ब्रह्मपुरी, मध्य चांदा वन विभागात हल्ल्याच्या घटना सातत्याने घडत असतात.
डिसेंबर महिन्यात जुनोना क्षेत्रातच वाघाच्या हल्ल्यात एका सहा वर्षीय बालिकेसह दोन जणांचा बळी गेला. या दोन्ही घटनांच्या वेळी हजारो संतप्त लोक एकत्र आले आणि वन कर्मचाऱ्यांना घेराव केला. या वेळी वन अधिकाऱ्यांनी संतप्त लोकांची कशीबशी समजूत काढली. त्यानंतर बिबटय़ालासुद्धा जेरबंद केले. बहुतांश वेळा तर संतप्त जमावाने वन कर्मचाऱ्यांना मारहाणसुद्धा केली आहे. याच वर्षी सावली तालुक्यातील निफंद्रा येथे संतप्त गावकऱ्यांनी वाघ व बिबटय़ांचे हल्ले बघता बिबटय़ाच्या दोन पिल्लांना जिवंत जाळले.
या वेळी वन कर्मचाऱ्यांवर हल्लासुद्धा झाला होता. मानव-वन्यप्राणी संघर्षांत गावकरी अधिक आक्रमक होत असल्याने वन कर्मचाऱ्यांना त्याचा परिणामसुद्धा भोगावा लागतो. ही सर्व मेहनत केल्यानंतरसुध्दा वन खात्याकडून व्याघ्र भत्ता देण्यात भेदभाव केला जात असेल, तर अशी संघर्षांची कामे करायचीच कशाला हा विचारसुद्धा या वन कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण झाला आहे.
या तिन्ही विभागांतील कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन व्याघ्र भत्ता मिळावा, अशी मागणी मुख्य वनसंरक्षकांकडे केली.  वनमंत्री पतंगराव कदम व राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे सदस्य सचिव डॉ. राजेश गोपाल यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यातसुद्धा सांगितले.
मात्र त्यानंतर त्याचा पाठपुरावा न झाल्याने जवळपास एक हजार कर्मचारी व्याघ्र भत्त्यापासून वंचित आहेत. या सर्व एक हजार कर्मचाऱ्यांनी आता आम्हालासुद्धा व्याघ्र भत्ता मिळावा, अशी मागणी लावून धरली आहे. आम्ही प्रत्यक्ष जंगलात काम करतो, वाघ, बिबट व वेळप्रसंगी मनुष्यप्राण्यांचे हल्ले व संघर्षांला तोंड द्यावे लागते. त्यामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पाप्रमाणेच आम्हालासुद्धा व्याघ्र भत्ता देण्यात यावा, अशी मागणी चंद्रपूर, ब्रह्मपुरी व मध्य चांदा वन खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे.

Story img Loader