ठाणे महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागांत ठेकेदारामार्फत कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांना अप्रत्यक्षपणे (ठोक पगारावर) महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्याचा आग्रह धरणाऱ्या सर्वपक्षीय नगरसेवकांना महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी नकार देऊन एकप्रकारे धक्का दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे कारण पुढे करत या कामगारांना ठोक पगार पद्धतीवर महापालिका सेवेत घेता येऊ शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी नियमानुसार भरती प्रक्रिया राबविण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून ठेकेदारामार्फत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी मिळविण्याचे ‘माग’चे दार आता बंद झाले आहे.
ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा, घनकचरा, बांधकाम, अतिक्रमण आणि मालमत्ता कर यासह अन्य विभागांमध्ये ठेकेदारामार्फत काही कर्मचारी काम करीत आहेत. महापालिकेने अप्रत्यक्षपणे (ठोक पगार) पद्धतीवर कामावर घ्यावे, अशी या कर्मचाऱ्यांची अपेक्षा आहे. याच आशेवर गेल्या कित्येक वर्षांपासून ते महापालिकेत कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत. तसेच महापालिकेच्या कामकाजाचा अनुभव असल्यामुळे भरती प्रकियेत आपल्याला प्राधान्य मिळेल, अशी अपेक्षा कर्मचारी बाळगून होते.
मात्र त्यांची ही आशा आता फोल ठरली आहे. ठाणे महापालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ठोक पगार पद्धतीने कामावर घेण्यात यावे, असा आग्रह सर्वपक्षीय नगरसेवकांनी गुरुवारच्या सर्वसाधरण सभेत धरला होता. या कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या कामकाजाचा अनुभव असून गेल्या कित्येक वर्षांपासून ते कंत्राटी पद्धतीने महापालिकेत काम करीत आहेत. त्यांचे वयही जास्त असल्यामुळे ते भरती प्रक्रियेसाठी पात्र ठरू शकत नाहीत, त्यामुळे त्यांना ठोक पगार पद्धतीने महापालिका सेवेत सामावून घेण्यात यावे, असा सूर सर्वच नगरसेवकांनी लावला होता.
मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे कारण पुढे करत महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी सर्व पक्षीय नगरसेवकांना धक्का दिला. या कर्मचाऱ्यांना ठोक पगार पद्धतीने सामावून घेतले तर न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होईल, असे आयुक्त गुप्ता यांनी स्पष्ट केले. तसेच नियमानुसार भरती प्रक्रियेतून कर्मचाऱ्यांची निवड करण्यात येईल. मात्र त्यामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी वयाची अट शिथिल करता येऊ शकते का, याविषयी विचार करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Story img Loader