दिवा रेल्वे स्थानकात प्रवाशांचा उद्रेक झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली आणि सकाळी दहा-साडेदहाच्या सुमारास मुंबईच्या दिशेने निघालेल्या असंख्य प्रवाशांचा खोळंबा झाला. सकाळीच पेंटोग्राफ तुटल्याने रडतखडत छत्रपती शिवाजी टर्मिनसवर पोहोचलेल्या रेल्वेगाडय़ांमुळे अनेक कर्मचाऱ्यांना कार्यालय गाठण्यासाठी विलंब झाला. पण दिवा रेल्वे स्थानकात उडालेल्या भडक्यामुळे सायंकाळी घरी कसे पोहोचायचे या प्रश्नाने अनेकांच्या मनात चलबिचल सुरू होती. परिणामी कार्यालय गाठलेल्यांचे कामात लक्ष नव्हते. तर अनेकांनी कार्यालयाला बुट्टी मारून घरी बसणे पसंत केले. परिणामी सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये मोठय़ा संख्येने कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती जाणवत होती.
पहाटे ६.३० च्या सुमारास ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान पेंटोग्राफ तुटल्याचे वृत्त पश्चिम रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या कानी पडले आणि त्यांची तारांबळ उडाली. रेल्वे गाडी पकडण्यासाठी स्थानकात आलेल्या अनेक प्रवाशांनी कार्यालयाला बुट्टी मारण्याचा निर्णय घेतला आणि घरचा रस्ता धरला. तर आज हमखास कार्यालयात पोहोचण्यास विलंब होणार अशी खूणगाठ बांधून अनेकांनी मिळेल ती रेल्वे गाडी धरली. कूर्मगतीने या गाडय़ा छत्रपती शिवाजी टर्मिनसवर पोहोचत होत्या. विलंबाने का होईना पण कार्यालय गाठता आल्याने नोकरदारांचे चेहरे उजळले होते. पण दिवा रेल्वे स्थानकात प्रवाशांचा भडका उडाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे वृत्त सर्वत्र पसरले आणि कार्यालयात पोहोचलेल्या नोकरदारांची चलबिचल सुरू झाली. सायंकाळपर्यंत     पान ३ पाहा परिस्थिती निवळली नाही तर घरी कसे पोहोचायचे असा प्रश्न त्यांना भेडसावू लागला. अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन कार्यालयातून लवकर निघायचे का, अशी कुजबुजही कर्मचाऱ्यांमध्ये सुरू होती. त्यामुळे कार्यालयात उशिरा पोहोचलेल्या नोकरदारांचे कामात लक्षच नव्हते. मात्र दुपारी हळूहळू मध्य रेल्वे सुरू झाल्याचे वृत्त समजताच या नोकरदारांचा जीव भांडय़ात पडला. मात्र सुरू झालेली मध्य रेल्वे रडतखडत एकेक रेल्वे स्थानक गाठत पुढे जात असल्याचे समजताच नोकरदारांनी घरी जाण्यासाठी कार्यालयांतून लवकर काढता पाय घेतला. परिणामी सरकारी आणि खासगी कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांची उपस्थिती रोडावल्याचे जाणवत होते.
मुंबईमधील बहुसंख्य विद्यार्थी बदलापूर, वांगणी आणि कर्जत या परिसरातील अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयांमध्ये जातात. नेहमीप्रमाणे आज ते सकाळी महाविद्यालयामध्ये जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर पोहोचले. पण मध्य रेल्वे कोलमडल्याचे कळताच बहुसंख्य विद्यार्थ्यांना महाविद्यालयात वेळेवर पोहोचता आले नाही.

Story img Loader