सर्वांपर्यंत उच्च शिक्षणाची सुविधा पोहोचवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून उच्च शिक्षण घेतल्यानंतर तरुणांनी सुशिक्षित बेरोजगार न राहता त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याचे बळ शासनाकडून देण्यात येत आहे. रोजगाराभिमुख उच्च शिक्षण हे ध्येय सरकारने समोर ठेवले आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री डी.पी. सावंत यांनी गुरुवारी येथे केले.
येथील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती केंद्र परिसरात आयोजित करण्यात आलेल्या डॉ. भाऊसाहेबांच्या ११५ व्या जयंती सोहळयात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. अरुण शेळके होते. यावेळी खासदार आनंदराव अडसूळ, आमदार रावसाहेब शेखावत, महापौर वंदना कंगाले, महिला काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्ष पुष्पा बोंडे उपस्थित होत्या.
शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरूच असून, अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचा प्रश्न देखील लवकरच सोडवला जाईल, अशी ग्वाही राज्यमंत्री डी.पी.सावंत यांनी दिली. आपल्या विद्यापीठांमधून संशोधक बाहेर पडायला हवेत, पण आज विद्यापीठे केवळ परीक्षा केंद्रे बनली आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांचे हीत हाच उच्च शिक्षण विभागाच्या धोरणांचा आणि अंमलबाजवणी यंत्रणांचा केंद्रबिंदू असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना ताठ मानेने जगवायचे असेल, तर शेतीसाठी तंत्रज्ञान, शेतमालाला चांगला भाव, ठिंबक किंवा तुषार सिंचन सहजपणे उपलब्ध झाले पाहिजे. डॉ. पंजाबराव देशमुख यांचे कार्य समाजाला प्रेरणा देणारे आहे. कृषी आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या कर्तृत्वामुळे शेती संशोधन होऊन शिक्षणाची गंगा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली, असे डी.पी. सावंत म्हणाले.
डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या विचारांची आजही गरज असून, त्यांच्या विचारांचा आदर्श डोळयासमोर ठेवून सर्वागीण विकास साधता येईल, असे खासदार आनंदराव अडसूळ म्हणाले. डॉ. पंजाबरावांचे कार्य हे त्यांच्या दूरदृष्टीचे द्योतक असल्याचे रावसाहेब शेखावत म्हणाले. शेती ही देशाची संस्कृती असून डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या विचारांच्या आधारे संस्थेची वाटचाल सुरू असल्याने अरुण शेळके यांनी सांगितले.
कार्यक्रमात संस्थेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. प्रवीण भोयर, जितेंद्र इंगहे, डॉ. मोहम्मद मुसद्दिक, मीना वानखडे, दिनकर म्हसणे, सुभाष मानकर हे यंदाच्या पुरस्कारांचे मानकरी ठरले. कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष बाबासाहेब चर्जन, महादेव भुईभार, डॉ. सुरेश ठाकरे, हरीहर ठाकरे, प्रशांत वानखडे आदी उपस्थित होते. संचालन प्रा. डॉ. किशोर फुले यांनी केले, तर संस्थेचे सचिव वि.गो. भांबूरकर यांनी आभार मानले.

Story img Loader