जागतिक मंदीमुळे मिहानमध्ये मोठे उद्योग येऊ शकले नाहीत. परंतु मंदीचे सावट आता दूर होत असून लवकरच मोठे उद्योग मिहानमध्ये येतील. त्यामुळे व्यवस्थापन व तंत्रशिक्षण घेतलेल्या तरुणांना रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध होणार आहे. त्यांना दुसरीकडे जाण्याची गरज भासणार नाही. तरुणांनी कौशल्य वाढविण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन खासदार विलास मुत्तेमवार यांनी केले.
उमरेड मार्गावरील विहीरगावजवळील सूर्योदय अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून उच्च व तंत्रज्ञान शिक्षण विभागाचे सहसंचालक गुलाबराव गावंडे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील अभियांत्रिकी विभागाचे अधिष्ठाता डॉ. आर.व्ही. क्षीरसागर, माजी सिनेट सदस्य डी.के. अग्रवाल, शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष जयप्रकाश गुप्ता, महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष दीपक चाफले, संचालक अभिषेक बेलखेडे, प्राचार्य डॉ. एस.एम. चांदेकर प्रामुख्याने उपस्थित होते.
अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू करणे सोपे नाही. सध्या महाविद्यालयांपुढे खूप आव्हाने आहेत. परंतु अशाही स्थितीत बहुजन समाजातील तरुणांना तंत्रशिक्षण मिळावे, त्यांच्यासोबतच महाराष्ट्राचा पर्यायाने देशाचा विकास व्हावा, या हेतूने दीपक चाफले यांनी सूर्योदय अभियांत्रिकी महाविद्यालय उघडले. या महाविद्यालयाने कमी कालावधीतच नेत्रदीपक प्रगती केली. या महाविद्यालयातील विविध शाखेत आज ८०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हे विद्यार्थी या महाविद्यालयाचे नाव मोठे करून नागपूरच्या विकासाला हातभार लावतील, अशी अपेक्षाही मुत्तेमवार यांनी व्यक्त केली.
जागतिक मंदीमुळे मिहानमध्ये मोठ-मोठे उद्योग येऊ शकले नाहीत. हे मंदीचे सावट आता दूर होत आहे. देशातील अन्य शहराच्या तुलनेच उद्योगांसाठी नागपूर हाच पर्याय शिल्लक आहे. त्यामुळे मिहानमध्ये मोठ उद्योग येतील. या उद्योगांना हजारो प्रशिक्षित मनुष्यबळ लागणार आहे. त्यामुळे नागपुरातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. या संधीचा फायदा देशाच्या विकासासाठी करून घ्यावा. कारण आजच्या तरुणांमुळेच देश महाशक्ती बनणार असल्याकडेही मुत्तेमवार यांनी लक्ष वेधले. संस्थेचे अध्यक्ष दीपक चाफले म्हणाले, गेल्या चार वर्षांत महाविद्यालयाने गुणवत्तेच्या आधारावर आपले स्थान निर्माण केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण घेण्याची संधी प्राप्त व्हावी व त्यांचा विकास व्हावा, या हेतूने या महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. या महाविद्यालयाने जागतिक पातळीवर स्पर्धा करू शकतील असे अभियंते निर्माण केले असल्याचेही त्यांनी सांगितले.
संस्थेचे संचालक अभिषेक बेलखेडे यांनी शिक्षणाच्या व्यावहारिक उपयुक्ततेवर भर दिला. प्राचार्य डॉ. एस.एस. चांदेकर यांनी प्रास्ताविकातून महाविद्यालयाच्या स्थापनेपासून तर आतापर्यंतच्या विकासाचा आढावा घेतला. खासदार विलास मुत्तेमवार यांच्या हस्ते महाविद्यालयाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. श्वेता शेलगावकर यांनी संचालन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा